Water Supply : दुष्‍काळी तालुक्याची वाटचाल जलसंधारणातून जलयुक्तकडे

माण तालुक्याची सध्या जलसंधारणातून जलयुक्तकडे म्हणजेच पाण्याच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.
Manganga River
Manganga Riversakal
Summary

माण तालुक्याची सध्या जलसंधारणातून जलयुक्तकडे म्हणजेच पाण्याच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.

दहिवडी - माण तालुक्याची सध्या जलसंधारणातून जलयुक्तकडे म्हणजेच पाण्याच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीदार माण तालुक्याला दुष्काळी म्हणून हिणवताना विचार करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील व सर्वच बाजूंनी दुर्लक्षित दुष्काळी म्हणून माण तालुक्याची जुनी ओळख. निसर्गाची मोठी अवकृपा हे मुख्य कारण असले, तरी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व इथल्या जनतेची जैसे थे राहण्याची मानसिकताही तितकीच कारणीभूत होती. दर तीन- चार वर्षांनी येणारे दुष्काळाचे दुष्टचक्र नेहमीच माणच्या मानगुटीवर बसले होते. मात्र, गेल्या काही वर्षापूर्वी हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. उरमोडी, टेंभू, तारळी व होऊ घातलेली जिहे-कटापूर या उपसा सिंचन योजनांचा माणला थोड्याबहुत प्रमाणात हंगामी फायदा होणार आहे.

या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील; पण त्यापूर्वीच खऱ्या अर्थाने चित्र बदलले ते इथल्या माणसांची मानसिकता अन् परिश्रमातून. माणगंगा पुनरुज्जीवन या उपक्रमातून याची सुरुवात झाली. या अंतर्गत माणगंगा नदीवरील अठरा कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्याचे रूपांतर सिमेंट बंधाऱ्यात करण्यात आले. याचा नदीकाठावरील गावांना मोठा फायदा झाला. त्यानंतर जलयुक्त शिवार ही शासनाची योजना आली. प्रशासनाची चांगली साथ मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी ही योजना उचलून धरली. या योजनेचा अनेक गावांना चांगला लाभ झाला. पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी व दिवडी ही चार गाव जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यभर गाजली. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार गावोगावी राबविण्यात आली. यातून तलावांची पाणी साठवण क्षमता वाढली तर शिवारे सुपीक झाली.

या भक्कम पायावर उभी राहिली ती पाणी फाउंडेशनची चळवळ. माणला महाराष्ट्राच्या नकाशावर मानाचं स्थान देण्यात या चळवळीने मोठी भूमिका बजावली. वॉटर कप स्पर्धेत माणच्या जनतेसोबत, राजकीय, तसेच प्रशासकीय सुपुत्रांनी तन, मन, धन अर्पण काम केले. हजारो हातांनी, लाखो तास घाम गाळला. मशिनरीच्या लाखो घनफूट काम करण्यात आले. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. याचाच परिपाक म्हणून माणचा डंका महाराष्ट्रात वाजला. बिदाल, टाकेवाडी, भांडवली, शिंदी खुर्द यांनी वॉटर कपवर नाव कोरले. या सर्व कामांमुळे यंदा ओढे खळाळले, बंधारे भरले, माणगंगा नदी एकही पूर न येता फक्त निवळीच्या स्वच्छ पाण्यावर वाहिली.

तालुक्यात जलसंधारणातून सलग समतल चर, खोल सलग समतल चर, बांधबंदिस्ती, अनघड दगडी बांध, माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, गॅबियन बंधारे, जुन्या जलसाठ्याचे पुनरुज्जीवन करणे, नाले, ओढे, नदी खोलीकरण, रुंदीकरण ही महत्त्वपूर्ण कामे झाली आहेत. त्यामुळे भूगर्भातील जलपातळी वाढली, विंधन विहीर व विहिरींना पाणी फुटले, बंधारे पाण्याने भरले, ओढे व नदी वाहती झाली. पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे प्रमाण घटले नव्हे, तर जवळपास शून्यावर आले. शेतीला पाण्याची उपलब्धता झाली. उन्हाळी हंगामात पिके घेणे शक्य होऊ लागले. उत्पन्न वाढले. जीवनमान व राहणीमानात सुधारणा झाली.

गरज... जलसंरक्षण व जलबचतीची

जलसंधारणातून जलयुक्त झालेल्या माणमध्ये आता जलसंरक्षण व जलबचतीची गरज आहे. अनेकदा गरज पूर्ण झाली, की दुष्काळ विसरला जातो. त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या परिस्थिती होते. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरले पाहिजे. शेती करताना ठिबक, तुषार आदी जलबचतीच्या साधनांचा वापर केला पाहिजे. पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून कमी पाण्यावरील पिकांकडे वळावे लागेल.

‘सकाळ’ची साथ मोलाची...

माणमधील दहिवडी, भांडवली, मोगराळे, राजवडी, गोंदवले, किरकसाल आदी तब्बल १४ गावांतील जलसाठ्यांमधील गाळ काढण्याच्या कामासाठी सकाळ रिलीफ फंडातून प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात आले. त्यामुळे या जलसंधारणाच्या कामात ‘सकाळ’ची मोलाची साथ लाभली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com