
- फिरोज तांबोळी
गोंदवले : माण तालुक्यात लांडगा संरक्षण आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मोठी चालना मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील पहिलेच व्यापक स्वरूपातील संशोधन करण्यात येणार आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील २५ गावात याबाबतच्या अभ्यासाचे नियोजन करण्यात आले असून येत्या एप्रिलमध्ये याची सुरुवात केली जाणार आहे. वन्यप्राण्यांबाबतची माहिती संकलन व त्यांच्या संवर्धनासाठी योजण्यात येणाऱ्या आराखड्यासाठी हे पाहिले आश्वासक पाऊल पडणार आहे. विशेषतः किरकसाल जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या पुढाकारातून सुरू होणाऱ्या या अभ्यासासाठी वन विभागासह WWF इंडिया (वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर)आणि द हॅबिटॅट ट्रस्ट यांनीही पाठिंबा दिला आहे.