
गोंदवले (जि. सातारा) : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण चालू आहे. मात्र, माणमधील बोडके (माणगंगानगर) येथील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मोबाईलअभावी त्यापासून वंचित असल्याने दयाराणी खरात या शिक्षिका थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन धडे देत आहेत. त्यांच्या "शाळा आली अंगणी' या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यात यश मिळाले आहे.
आंधळी तलावालगत असणाऱ्या बोडके गावांतर्गत पुनर्वसित माणगंगानगर गाव आहे. बहुतांश अशिक्षित व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे लोक तेथे राहतात. येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा परिषदेची दोन शिक्षकी वस्तीशाळा आहे. अवघे 27 विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी कुटुंबाची आर्थिक स्थिती नेहमीच अडसर ठरते. सध्याच्या कोरोना काळातही हीच परिस्थिती शिक्षणासाठी मैलाचा दगड बनला होता. शासनाने ऑनलाइन शिक्षणाची उपाययोजना केली असली तरी हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांतील या वस्तीवरील मुलांना अँड्रॉइड मोबाईल मिळणार कुठून? हा प्रश्न होताच. परंतु, या मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी येथील शिक्षिका दयाराणी खरात यांनी स्वतःच पुढाकार घेतला अन् मग शाळाच थेट विद्यार्थ्यांच्या अंगणी आणली.
विद्यार्थ्यांचा अभ्यास घेताना गर्दी टाळावी, यासाठी सौ. खरात यांनी मुलांचे काही ग्रुप बनवले. मग काही जण विद्यार्थ्यांच्याच घरासमोरील अंगणात, तर काही जण शाळेच्या प्रांगणात अभ्यासाचे धडे घेऊ लागले. खरात मॅडमची ही शाळा सुरू झाली तीही अगदी सोशल डिस्टन्स आणि इतर नियमांचे काटेकोर पालन करूनच. नियमित पाठ्यपुस्तकांबरोबरच स्वाध्याय पुस्तिकाही या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रोज वेळ मिळेल तसा हा अभ्यास वर्ग सुरूच आहे. स्पर्धा परीक्षेसाठीदेखील विद्यार्थ्यांचा पाठ घेतला जात आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे शाळेपासून दुरावलेले विद्यार्थी आता अभ्यासात रमू लागले आहेत. दरम्यान, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आणि आमच्याकडे मोबाईल नसल्याने शिक्षण कसे मिळणार? हा प्रश्न होता. पण, खरात मॅडम घरी येऊन अभ्यास घेत असल्याने खूप आनंद होत असल्याचे आदित्य जाधव या विद्यार्थ्याने सांगितले.
कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या माणगंगानगर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या "शाळा आली अंगणी' उपक्रमातून शिक्षण देत असल्याने खूप समाधान मिळत आहे.
-दयाराणी खरात, शिक्षिका, प्राथमिक शाळा, माणगंगानगर
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.