मातंग समाजाच्या आरक्षणासाठी नव्या वर्षात राज्यभर आंदोलन : प्रा. मच्छिंद्र सकटे

हेमंत पवार
Sunday, 27 December 2020

आण्णा भाऊ साठे महामंडळात भ्रष्टाचार झाल्यावर सहा वर्षे ते महामंडळ बंद आहे. त्यामुळे तरुण, महिला, युवकांना आर्थिक पुरवठा होत होता तो बंद झाला. त्यातून एक पिढी गारद करण्याचे काम झाले आहे. ते महामंडळ सुरू करावे, यासाठीही आंदोलन आहे, असे पदाधिका-यांनी नमूद केले.

कऱ्हाड ः अनुसूचित जातीमधील आरक्षणातून एकच जात जास्तीतजास्त आरक्षण घेत आहे. त्यामुळे आमचा वाटा आम्हाला मिळत नाही. त्यासाठी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी एक जानेवारीपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. बार्टीच्या धर्तीवर आर्टी सुरू करावी आणि आण्णा भाऊ साठे महामंडळ पुन्हा सुरू करावे, यासाठीही पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
 
दलित महासंघाच्या वतीने होणाऱ्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महासंघाचे राज्य सरचिटणीस प्रकाश वायदंडे, जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, तालुकाध्यक्ष दिलीप सकटे, तालुका संघटक शैलेश भिंगारदेवे, रामभाऊ दाभाडे, शिवाजी वायदंडे, आशिष मोरे उपस्थित होते. प्रा. सकटे म्हणाले, ""आरक्षणाविषयी देशात संघर्ष सुरू आहे. सर्व जातीसमूह आपल्या जातीसाठी आरक्षण मिळावे, यासाठी संघर्ष करत आहेत. जातीच्या न्याय्य हक्कासाठी यात काय गैर नाही. मराठ्यांचा आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला आहे. अनुसूचित जातीला 13 टक्के आरक्षण आहे. अनुसूचित जमातीसाठी सात टक्के, तर ओबीसीसाठी 27 टक्के, एनटीसाठी स्वतंत्र आरक्षण आहे. अनुसूचित जातीच्या 13 टक्के आरक्षणात 59 जाती आहेत. त्यातील एकच जात जास्तीत- जास्त आरक्षणाचा लाभ घेत आहे आणि आमचा वाटा आम्हाला मिळत नाही, अशी 58 जातींची भावना आहे. त्यामुळे भटक्‍या विमुक्त जाती प्रवर्गात जसे अ, ब, क, ड वर्गवारी आहे. तशीच अनुसूचित जातीमध्येही अ, ब, क, ड वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ही मागणी महाराष्ट्रात 20 वर्षांपासून सुरू आहे. त्याची सुरुवात आंध्र, तेलंगणापासून सुरू झाली आहे. तेथे त्यांना आरक्षण देण्यात आले. तमिळनाडूनेही ते मान्य केले आहे.

ट्रॅक्‍टरखाली चिरडलेल्याचा तहसीलदारांनी वाचविला जीव; एक ठार

त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील नेते मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, अशी मागणी 20 वर्षे करत आहेत. सरकार मराठा समाजाच्या आरक्षणावर, धनगर आरक्षणावर बैठक घ्यायला रात्री 12 वाजताही तयार आहे. मात्र, मातंग समाजाला न्याय देण्यासाठी बैठक घेण्यासाठी सरकारकडे वेळ नाही. दलित महासंघाच्या संसद मंडळाच्या बैठकीत मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था काम करते. अनुसूचित जातीसाठी त्या अगोदरपासून बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच बार्टी काम करते. सरकारने बार्टीच्या धर्तीवर आण्णा भाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच आर्टीची स्थापना करावी.'' 

युवकांचा आर्थिक पुरवठा बंद 

आण्णा भाऊ साठे महामंडळात भ्रष्टाचार झाल्यावर सहा वर्षे ते महामंडळ बंद आहे. त्यामुळे तरुण, महिला, युवकांना आर्थिक पुरवठा होत होता तो बंद झाला. त्यातून एक पिढी गारद करण्याचे काम झाले आहे. ते महामंडळ सुरू करावे, यासाठीही आंदोलन आहे, असे त्यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Machindra Sakte Demands Independent Reservation For Matang Community Satara News