एसटीच्या मालवाहतूकीस साता-यातून तुफान प्रतिसाद

प्रशांत घाडगे
Monday, 26 October 2020

मागील काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केलेली मालवाहतूक सुविधा राज्यांतर्गत सुरू आहे. मात्र, मागील महिन्यात दोन ठिकाणी राज्याबाहेर परवानगी घेत वाहतूक केली आहे.

सातारा : मार्चपासून कोरोनाच्या संसर्गामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. या काळात एसटीचे उत्पन्न थांबल्याने महामंडळ तोट्यात आले आहे. त्यामुळे महामंडळाने उत्पन्न वाढविण्यासाठी राज्यभरात जून महिन्यापासून मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या सुविधेला सातारा विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामधून सातारा विभागातून दररोज 40 मालवाहतूक बस, तर प्रत्येक डेपोतून तीन ते चार बस बाहेरच्या जिल्ह्यात मालवाहतूक करत आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे सात महिने राज्यभरातील एसटी वाहतूक बंद होती. त्यादरम्यान महामंडळाकडे आर्थिक स्त्रोत नसल्याने काही महिने कर्मचाऱ्यांचे वेतनही थकीत होते. या स्थितीत महामंडळाने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बसचे ट्रकमध्ये रूपांतर करून मालवाहतूक सुरू करण्यात आली; परंतु प्रत्येकाला संपूर्ण ट्रकचे बुकिंग करून माल पाठविणे अशक्‍य असल्याने एसटीने पार्सल कुरिअर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

केंद्रासह राज्य सरकारला उदयनराजेंनी विचारला जाब; खासदार, आमदारांच्या दाेन वर्षांचे निधीचे काय केलं

त्यानुसार एखाद्या व्यक्तीने एसटी महामंडळाकडे पार्सल कुरिअर बुक केल्यास संबंधित व्यक्तीला पार्सल कुरिअर मिळत आहे. त्यामुळे दररोज मालवाहतूक ट्रकही मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. याचबरोबर मागील काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केलेली मालवाहतूक सुविधा राज्यांतर्गत सुरू आहे. मात्र, मागील महिन्यात दोन ठिकाणी राज्याबाहेर परवानगी घेत वाहतूक केली आहे.

स्वच्छ सर्वेक्षणचा महाबळेश्‍वरात अस्वच्छ कारभार; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर होणार कारवाई? 

नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे जाळे राज्यभरात पसरलेले आहे. एसटी महामंडळावर प्रवाशांच्या असलेल्या विश्‍वासामुळे विविध प्रकारचे साहित्य पोचविण्यासाठी प्रवासी येत आहेत. त्यामुळे सातारा विभागातही मालवाहतुकीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

- रेश्‍मा गाडेकर, आगार प्रमुख (कनिष्ठ), सातारा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Transport Satara Division Working Efficiently Satara News