Mahashivratri 2021 : वासोटा मार्गे नागेश्वरला निघालात? थांबा! त्यापुर्वी हे वाचा

सूर्यकांत पवार
Tuesday, 9 March 2021

महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असल्याने या दिवशी वनविभागाची परवानगी लागत नाही. तसेच या दिवशी बामणोली, शेंबडी येथील बोट क्लबच्या बोटी अगोदर बुकींग न करता ही सहज कमी खर्चात उपलब्ध होतात. त्यामुळे हजारो भाविक या दिवशी या ठिकाणी येत असतात.

कास (सातारा) : संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कोयना नदीच्या शिवसागर जलाशयाच्या क्षेत्रात असलेली वासोटा किल्ल्याजवळचे नागेश्वर, कांदाटी खोऱ्यातील पर्वत तर्फ वाघावळे येथील जोम मल्लिकार्जून व चकदेव येथील चौकेश्वर महादेव ही सर्व स्वयंभू महादेवाची स्थाने महाशिवरात्रीला बंद राहणार आहेत. वनपरिक्षेत्र वन्यजीव बामणोली कार्यालय व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचेकडून सर्व पर्यटक, भाविकांनी 11 मार्चला यात्रा काळात येऊ नये असे आवाहन केले आहे.

बामणोली परिक्षेत्र अंतर्गत चकदेव (चौकेश्वर), पर्वत (मल्लिकार्जुन) व वासोटा नागेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त भक्तगण दर्शनासाठी येत असतात. परंतू सद्य परिस्थितीत वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशान्वये यात्रा, जत्रा इत्यादी धार्मिक कार्यक्रम बंद ठेवण्यास सूचित करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Video : दमल्या भागलेल्यांना चैतन्य देऊन गेला नागेश्‍वर

राज्यभरातील ट्रेकर्सना भुरळ घालणारा वासोटा किल्ल्याच्या जवळच नागेश्वरचा सुळका आहे. गुहेत असणा-या या स्वंयभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. अन्य वेळेसही या ठिकाणी जायचे झाल्यास वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. परंतु महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असल्याने या दिवशी वनविभागाची परवानगी लागत नाही. तसेच या दिवशी बामणोली, शेंबडी येथील बोट क्लबच्या बोटी अगोदर बुकींग न करता ही सहज कमी खर्चात उपलब्ध होतात. त्यामुळे हजारो भाविक या दिवशी या ठिकाणी येत असतात.

नागेश्वर येथे जाणेचा मार्ग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने, तसेच चकदेव, कोयना अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट असल्याने आणि पर्वत हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात समाविष्ट असल्याने ११ मार्चला बामणोली परिक्षेत्रातील वासोटा, चकदेव, पर्वत या ठिकाणी जाणे करीता कार्यालयाकडून परवानगी दिली जाणार नाही. भाविकांना सहकार्य करावे असे आवाहन बा.दि. हसबनिस, वनक्षेत्रपाल वन्यजीव बामणोली यांनी केले आहे.

पाेलिसांनी पकडल्यानंतर गजा मारणे म्हणाला, फक्त दोनच दिवस राहिले होते

Maharashtra Budget 2021 : साता-यातील मेडिकल कॉलेजसाठी भरीव निधी; अजित पवारांची आग्रही भूमिका

Mahashivratri 2021 : श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टने जाहीर केला महत्वपुर्ण निर्णय

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahashivratri 2021 Vasota Nageshwar Chakdev Malikaarjun Satara Marathi News