'महाविकास'च्या प्रचारार्थ पारंपरिक विरोधक एका व्यासपीठावर; भाजपच्या पायाखालची वाळू सरकणार!

जालिंदर सत्रे
Tuesday, 24 November 2020

जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. आपण सर्व जण एकत्रित आलो आहोत, हा ऐतिहासिक क्षण होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाचा साक्षीदार व्हावा. यासाठी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

पाटण (जि. सातारा) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाटण तालुक्‍यातील पारंपरिक विरोधक गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर एकाच व्यासपीठावर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. आघाडी धर्म पाळताना एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता दोघांसह कार्यकर्त्यांनीही संवाद साधला. याचीच चर्चा सोमवारी दिवसभर तालुक्‍यात सुरू होती.

महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पाटण येथील पाटण स्पोर्टस ऍण्ड हेल्थ क्‍लबच्या स्टेडियममध्ये आयोजिलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, महाविकास आघाडीचे पदवीधर व शिक्षक निवडणुकीचे प्रचार प्रमुख सारंगबाबा पाटील, कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ यादव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

पदवीधर निवडणूक भाजपला महाविकासची ताकद दाखवून देण्यासाठीच; रामराजेंचा विरोधकांना टोला 

जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. आपण सर्व जण एकत्रित आलो आहोत, हा ऐतिहासिक क्षण होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाचा साक्षीदार व्हावा. यासाठी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. दरम्यान, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधक असणारे राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर एकाच व्यासपीठावर येण्याचा योग तालुक्‍याला पाहण्याची संधी मिळाली. गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, ""तिन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी प्रचार करून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना जास्तीतजास्त मतदान करून विजयी करूया. एकही मत वाया न जाता तालुक्‍यातून शंभर टक्के मतदान करून आपली जबाबदारी पार पाडावी.'' सत्यजितदादा आणि आम्ही सर्व एकत्र येऊन या निवडणुकीचे नियोजन करू आणि पाटण विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी नक्कीच घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या, तरी महाविकास आघाडी डगमगणार नाही : देसाई

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, ""राज्याबरोबर तालुक्‍यात पहिल्यांदाच तिन्ही पक्ष एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपकडून सातत्याने नेतृत्वावर टीका केली जात आहे, याचा निषेध होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना बहुसंख्य मताने निवडून देऊन करावा.'' या वेळी कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, सारंग बाबा पाटील, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi Campaign Meeting At Patan Satara News