हक्काचा माणूस विधान परिषदेत पाठवा : राज्यमंत्री सतेज पाटील

आयाज मुल्ला
Saturday, 28 November 2020

खटाव तालुक्‍यातील बहुतांशी शिक्षण संस्था कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांच्या आहेत. महाविकास आघाडीचा विजय निश्‍चित आहे असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

वडूज (जि. सातारा) : शिक्षक व पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस विधान परिषदेत पाठवा, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. 

माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, अशोकराव गोडसे, सुरेंद्र गुदगे, प्रा. अर्जुनराव खाडे, प्रा. बंडा गोडसे, सुनील गोडसे, सचिन माळी, मनोहर शिंदे, विजय काळे, मानाजी घाडगे, विजय शिंदे, युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पाटील म्हणाले, ""इतर निवडणुकांपेक्षा पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक वेगळी आहे. यामध्ये मोजकेच मतदार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दक्ष राहून प्रत्येक मतदारापर्यंत पोचणे गरजेचे आहे. राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीची एक विचाराची सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्यास शिक्षक, पदवीधरांच्या समस्या मार्गी लागण्यास गती मिळेल.'' 

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ""महाविकास आघाडीतील सर्व नेतेमंडळींनी या निवडणुकीत एकत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. देशाची लोकशाही टिकविण्यासाठी, शेतकऱ्यांच्या व जनतेच्या हितासाठी, लोकांच्या हाताला काम देण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे. खटाव तालुक्‍यातील बहुतांशी शिक्षण संस्था कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांच्या आहेत. महाविकास आघाडीचा विजय निश्‍चित आहे. मात्र, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहून मतदान करावे.'' माजी आमदार घार्गे यांचेही भाषण झाले. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख यांनी प्रास्ताविक केले. माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले. पंचायत समितीचे माजी सदस्य भरत जाधव यांनी आभार मानले. 

सावधान! साता-यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने गंडा घालणारी टोळी सक्रिय

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi Meeting In Vaduj Pune Graduate Election Satej Patil Satara News