"महाविकास' लढणार सातारा पालिका निवडणुक; शशिकांत शिंदेंची घोषणा

उमेश बांबरे
Tuesday, 1 December 2020

मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

सातारा : राज्यात भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागत असल्याने सरकारला अडचणीत आणणे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, आरक्षणावरून समाजात दरी निर्माण करणे एवढेच काम भाजपच्या नेत्यांना राहिले आहे. कोणाला तरी पुढे करून ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करण्याचा कुटनीतीचा डाव खेळत आहेत. मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम असून, सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडत आहे. या प्रश्नावरून मराठा समाजात फूट पाडण्याचा डाव भाजपकडून खेळला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, सातारा नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
सातारा पालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. नगरपंचायती व सर्व पालिका निवडणुकांत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला तर तसाही निर्णय घेण्यात येईल. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही राजकारणविरहित ठेवण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे. आगामी निवडणुकीत तसा प्रयत्न राहू शकतो. जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच वर्चस्व आहे. मात्र, सहकारात राजकारण येऊ नये, अशी आमची कायमच भूमिका असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून राज्य सरकारवर प्रत्यक्षपणे, तर शरद पवारांसह माजी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ""मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वपक्षीयांची भावना आहे. मात्र, लोकांमध्ये बुद्धिभेद करून समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले हे राज्य सरकारवर आरोप करत आहेत.

वास्तविक, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. न्यायालयातही भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामीसाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असेल, तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नीही सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारने सूचना कराव्यात यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा.'' आरक्षणप्रश्नी काही लोकांना पुढे करून भाजप राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम केले. वास्तविक मराठा समाज गेल्या पाच वर्षांत एक झाला आणि त्यांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे या आरक्षणाला कोणाला दोषी धरणे योग्य होणार नाही.

मराठा ही निर्णायक जात; विश्वासघात झाल्यास जनताच तुम्हांला खाली खेचेल : उदयनराजे 

गेल्या पाच वर्षांत केंद्रात, राज्यात सत्ता असताना भाजपने आरक्षणाचा प्रश्न का मिटवला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या नेत्यांनी राजकारण न करता मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी केंद्र सरकारने सूचना करावी. मात्र, राज्य सरकारला दोष देण्याशिवाय भाजपचे नेते काहीच करताना दिसत नाहीत. मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप श्री. शिंदे यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi Will Contest Satara Municipal Council Election Declared Shashikant Shinde Satara News