'महाविकास' पालिका निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास दोन्ही राजांचा साता-यात लागणार कस

प्रवीण जाधव
Tuesday, 1 December 2020

तिसरा सक्षम पर्याय उभा राहताना दिसला, की पालिका निवडणुकीतील "मनोमिलन' तुटते आणि गरज असल्यास पुन्हा जुळते हे सातारकरांनी आजवर पहिले आहे. 

सातारा : पालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष व डावी आघाडी एकत्रितपणे सातारकरांना पर्याय उपलब्ध करून देणार आहेत. पालिकेची आगामी निवडणूक तिरंगी होणार, की चौरंगी हे दोन्ही राजांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या भाजपत असणाऱ्या दोन्ही राज्यांच्या गटांची काय भूमिका असणार याची सातारकरांना उत्सुकता असणार आहे.
 
सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीच्या सत्तेचे हे शेवटचे वर्ष आहे. मागिल पालिका निवडणुकांवेळी दोन्ही राजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. एकाच पक्षात असूनही पालिका निवडणुकांच्या तोंडावर साताऱ्यातील गाजलेले "मनोमिलन' तुटले. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडी व शिवेंद्रसिंहराजेंच्या नगर विकास आघाडीने स्वतंत्र निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी दीपक पवार हे भाजपमधून सक्रिय होते. सातारा पालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. थेट नगराध्यक्षांबरोबर काही अपवाद वगळता भाजपने नगरसेवकांच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तन-मन-धनाने या निवडणुकीत सक्रिय होते. दोन्ही राजांच्या आघाड्यांच्या विरोधात सातारकरांना चांगला पर्याय उपलब्ध झाला होता. त्यामुळे मागील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. नगराध्यक्षपदासाठी वेदांतिकाराजे भोसले व माधवी कदम यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनीही चांगले मते मिळविली होती. भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते. एकूणच तिहेरी लढतीमुळे पालिकेची निवडणूक रंगतदार झाली होती.
 
आगामी निवडणुकीत मात्र, मागील वेळचे हे चित्र बदलणार आहे. राष्ट्रवादीत असलेले दोन्ही राजे भाजपवासी झाली आहेत, तर भाजपत असलेले दीपक पवार हे राष्ट्रवादीत आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षपूर्तीच्या निमित्ताने केले. तेच साताऱ्यात काल विधान परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रतीत झाले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या चर्चेत सातारा पालिका निवडणुकाच्या व्यूहरचनेचाही बार फुटला. आगामी पालिका निवडणूक तीनही पक्षांबरोबर डाव्या आघाडीला सोबत घेऊन लढण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मूळ शहर व वाढीव भागामध्ये बैठका घेऊन काम सुरू करण्याचा निर्णयही झाला आहे. या पातळीवर लवकर निर्णय घेत "महाविकास'ने आघाडी घेतली आहे. त्याचा भविष्यात फायदाही होऊ शकतो. मात्र, "महाविकास'च्या या भूमिकेनंतर दोन्ही राजे काय धोरण ठरवणार याची चर्चा सुरू झाली आहे.
 
साताऱ्याचा आगामी आमदार सर्वसामान्याच असले, अशी भूमिका घेत पालिका निवडणुकीत उदयनराजेंकडून तुटलेले मनोमिलन विधानसभेच्या निवडणुकीसोबत खासदारकी लागल्याने अनौपचारिकपणे पुन्हा जुळले. पालिका निवडणुकीत ते कायम राहते, की एकाच पक्षात असून, दोन्ही राजांचे सवते सुभे उभे राहणार याची सातारकरांना उत्सुकता आहे. तिसरा सक्षम पर्याय उभा राहताना दिसला, की पालिका निवडणुकीतील "मनोमिलन' तुटते आणि गरज असल्यास पुन्हा जुळते हे सातारकरांनी आजवर पहिले आहे. 

महाविकास लढणार सातारा पालिका निवडणुक; शशिकांत शिंदेंची घोषणा

दोन्ही राजांचा कस लागणार हे निश्‍चित 

दरम्यान, महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या आव्हानाला दोन्ही राजे कसे सामोरे जातात हे पाहावे लागणार आहे. भाजप म्हणून निवडणूक लढायची झाल्यास दोन्हीच्या समर्थकांबरोबरच भाजपच्या कार्यकर्त्यांनाही सामावून घ्यावे लागणार आहे. अन्यथा मुळ भाजपवाल्यांचा वेगळा पयार्य उभा राहू शकतो. त्यावर सातारा पालिकेच्या निवडणुकीचे रंग अवलंबून असणार आहेत. त्यामुळे धोरण ठरविताना दोन्ही राजेंचा कस लागणार हे निश्‍चित.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Will Contest Satara Muncipal Council Election Against Udaynraje And Shivendrasinghraje Satara News