माणदेशात कुजवा रोगाने डाळिंबांचा सडा; शेतकरी चिंतेत

सल्लाउद्दीन चोपदार
Saturday, 24 October 2020

गतवर्षी पाणीटंचाईने त्रागून शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने टॅंकरच्या पाण्यावर डाळिंब बागा जिवंत ठेवल्या. यंदा मात्र नैसर्गिक हवामानातच बदल झाल्यामुळे यंदा खूपच वर्षांनी मॉन्सूनचा पाऊस बरसला. विशेषत: तालुक्‍याच्या पूर्व भागात सातत्याने तब्बल दोन महिने पावसाने हजेरी लावली आहे.

म्हसवड (जि. सातारा) : दुष्काळी माण तालुक्‍यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या डाळिंब बागांना अतिवृष्टीचा फटका बसून मृग बहारात तोडणीस आलेल्या डाळिंबाच्या फळास कुजवा रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात फळगळती होण्याचा प्रकार सुरू झाला आहे. 

गतवर्षी पाणीटंचाईने त्रागून शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने टॅंकरच्या पाण्यावर डाळिंब बागा जिवंत ठेवल्या. यंदा मात्र नैसर्गिक हवामानातच बदल झाल्यामुळे यंदा खूपच वर्षांनी मॉन्सूनचा पाऊस बरसला. विशेषत: तालुक्‍याच्या पूर्व भागात सातत्याने तब्बल दोन महिने पावसाने हजेरी लावली. नेहमीप्रमाणे शेतकरी बांधवांनी डाळिंबाचा मृग बहार धरला. प्रत्येक झाडास कळी व फुले व त्यानंतर फळेही समाधानकारक लागली. परंतु, परतीच्या मॉन्सूनने पुन्हा धोबीपछाड केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या फळांची तोडणी केली नाही, त्या झाडांवरील परिपक्व झालेल्या फळांना कुजवा रोगाचा प्रादुर्भाव जलदगतीने होऊ लागला. झाडावरची डाळिंबे कुजून प्रत्येक झाडाखाली फळांचा सडाच पडल्याचे चित्र म्हसवडसह देवापूर, पुळकोटी, पळसावडे, पाटोळ खडकी, हिंगणी, ढोकमोड, राऊतवाडी आदी गावांतील डाळिंब बागेत दिसून येत आहे. 

कऱ्हाडात बिहार पॅटर्न यशस्वी; 157 गावांतील 69 हजार वृक्षांना जीवदान

मृग बहार धरलेल्या डाळिंब बागांतील फळांना गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुजवा रोगामुळे झाडावरील फळांची गळती होऊन सुमारे 25 टक्के नुकसान झाले आहे. डाळिंब बागांचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई त्वरित द्यावी. 
-कुमार सूर्यवंशी, पाटोळ खडकी, ता. माण 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major Damage To Pomegranate Crop In Manadesha Satara News