‘किसन वीर’निवडणुकीत पाटील बंधूंचे अर्ज वैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किसन वीर सातारा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची  निवडणुक
‘किसन वीर’निवडणुकीत पाटील बंधूंचे अर्ज वैध

‘किसन वीर’निवडणुकीत पाटील बंधूंचे अर्ज वैध

वाई : भुईंज येथील किसन वीर सातारा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे आक्षेप घेतलेले अर्ज वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोहर माळी यांनी रात्री उशिरा जाहीर केले.

या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या ३ मे रोजी होत आहे. त्यासाठी संचालक मंडळातील २१ जागांसाठी ३४९ जणांचे अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी सोमवारी (ता.४) निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी ऊस उत्पादक कवठे-खंडाळा गटातून आमदार पाटील व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह कोरेगाव, सातारा, भुईंज, वाई-बावधन-जावळी गटातील अनेकांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. नियमानुसार मागील पाच वर्षांत तीन वेळा कारखान्याला ऊस गळितासाठी घातला गेला पाहिजे.

मात्र, ज्यांनी केवळ दोन वेळा कारखान्याला ऊस घातला आहे, अशा अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे पाटील बंधूंसह अनेकांची नावे अवैध उमेदवारांच्या यादीत आली. त्यावर पाटील बंधूंनी वकिलामार्फत आपली बाजू निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर मांडली. त्यानंतर अशा अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. याबाबत सक्षम पुरावा आणि म्हणणे मांडल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा हे अर्ज वैध ठरवले. या वेळी महादेव मस्कर यांचा अर्जदेखील वैध ठरला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी भुईंज गटातून दाखल केलेला अर्ज बाद झाला. या छाननीत ३४९ पैकी २४५ अर्ज वैध झाले. छाननीमध्ये सोसायटी मतदारसंघातून आमदार पाटील यांचा अर्ज वैध ठरला होता. आता ऊस उत्पादक गटातीलही अर्ज वैध झाल्याने ते कोणत्या गटातून निवडणूक लढणार, हे महत्त्‍वाचे आहे.

कारखान्याच्या या निवडणुकीत आजी-माजी संचालकांसह राष्ट्रवादी काँगेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांतील अनेक दिग्गजांनी उमेदवारी दाखल केले आहेत. त्यामुळे सत्तारूढ व विरोधी आघाडी असा सरळ सामना की तिरंगी लढत होणार, याबाबत सर्वसामान्य सभासदांमध्ये उत्सुकता आहे. तसेच शिवसेना आणि काँग्रेस कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी १९ एप्रिल ही अंतिम मुदत असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

भद्रशे भाटे

Web Title: Makrand Patil Brothers Application Valid Satara Sugar Factory Election Election Board Directors

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..