मलकापूर पालिका पथविक्रेता लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधी देणार

राजेंद्र ननावरे 
Friday, 4 September 2020

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या पथविक्रेता लाभार्थ्यांना पालिकेकडून दोन टक्के व्याज रक्कम प्रोत्साहन निधी म्हणून देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मलकापूर पालिकेचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. 

मलकापूर (जि.सातारा) : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या पथविक्रेता लाभार्थ्यांना पालिकेकडून दोन टक्के व्याज रक्कम प्रोत्साहन निधी म्हणून देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मलकापूर पालिकेचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली. 

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत शासनाकडून पात्र विक्रेता लाभार्थ्यांना सात टक्के व्याज अनुदान मिळणार आहे. योजनेंतर्गत नागरी पथविक्रेत्याला एक वर्ष परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवल कर्ज स्वरूपात बॅंकेकडून मिळणार आहे. कर्जावर रिझर्व्ह बॅंकेच्या प्रचलित दराप्रमाणे बॅंका व्याजदर लागू करणार आहे आणि जो पथविक्रेता नियमित कर्जफेड करणार आहेत, ते सात टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र ठरतील.

ही व्याज अनुदान रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. याशिवाय पालिकेने स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आणखी दोन टक्के व्याज अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पालिका हद्दीतील पथविक्रेत्यांना नऊ टक्के व्याज अनुदानाचा फायदा होणार आहे. 

सर्व नगरसेवक, नगरसेविकांनी आपापल्या प्रभागातील पथविक्रेता, फेरीवाला यांना सदर योजनेचा लाभ घेण्याविषयी पाठपुरावा करून उद्युक्त करावे, असे आवाहन नगराध्यक्षा नीलम येडगे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी केले आहे. या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असण्याची अट सध्या शिथिल करण्यात आली आहे.

अशा पथविक्रेत्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने अर्ज भरण्यात येणार असून, याची फी माफक आहे. तरी जास्तीत जास्त फेरीवाला विक्रेता, छोटे व्यावसायिकधारकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी श्रीमती शाहीर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मणेर यांच्याशी संपर्क साधावा.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malkapur Municipality Path vendor will provide incentive funds to the beneficiaries