कोरोनामुक्तीच्या जनजागृतीचे फलक घेऊन जावळीत मंडळांनी केले 'श्री' चे आगमन

विजय सपकाळ
Saturday, 22 August 2020

सावली येथील अजिंक्य नेहरू युवा मंडळांच्या श्री चे आगमन कोरोनामुक्तीच्या जनजागृतीचे फलक मंडळाचे सदस्य हातात घेवून त्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यामुळे मंडळांच्या या उपक्रमाबद्दल मंडळाचे अध्यक्ष नामदेव जुनघरे यांचे अनेकांनी कौतुक केले.

मेढा (सातारा) :  गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयांच्या जयघोषात पाच कार्यकर्त्यांच्याच उपस्थितीत ठिकठिकाणच्या सार्वजनिक श्री गणेश मंडळांच्या मूर्तीचे आज अनेक गावांत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत एक दिवस अगोदर श्रीं चे आगमन झाले. यामध्ये सावली येथील अजिंक्य नेहरू युवा मंडळांच्या श्री चे आगमन कोरोनामुक्तीच्या जनजागृतीचे फलक मंडळाचे सदस्य हातात घेवून त्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यामुळे मंडळांच्या या उपक्रमाबद्दल मंडळाचे अध्यक्ष नामदेव जुनघरे यांचे अनेकांनी कौतुक केले.

जावळी तालुक्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार शरद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक निलकंठ राठोड, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी केलेल्या आवाहनानुसार तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून १०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा एक गावं एक गणपती उपक्रम राबवित असून शासनाचे निर्बंध राखून श्री चे आगमन काल व आज विविध मंडळांनी सामाजिक आंतर राखून केले आहे. 

सावली येथील अजिंक्य नेहरू युवा मंडळाने एक गांव एक गणपती परंपरा यावर्षीही सलग ३१ पेक्षा जास्त वर्ष कायम राखून यावर्षी महाप्रसाद कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार रक्तदान शिबीर रविवारी (ता.२३) रोजी घेतले असून यासारखे विविध समाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

याचप्रमाणे तालुक्यातील विविध मंडळांनीही महाप्रसाद रद्द करून विधायक उपक्रमांकडे आपला कल वळविला आहे. सर्वत्र शांततेत विना वाजंत्री, विना गुलालाची उधळण करत भावपुर्ण वातावरणात कमी उंचीच्या व चार ते पाच कार्यकर्ता मूर्ती न उचलता येतील अशाच श्रींच्या मूर्तींना पसंती देत साधेपणाने गावोगावी श्रीचे आगमन झाले आहे.

एक-दोन दिवस अगोदर गावोगावी श्रीं चे आगमन...

तालुक्यात यावर्षी १०० गावांत एक गांव एक गणपती उपक्रम, साधेपणाने तालुक्यात एक व दोन दिवस अगोदर गावोगावी श्रीं चे आगमन उत्साहात झाले. रक्तदानासारखे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

सावलीयेथील अजिंक्य नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष नामदेव जुनघरे म्हणाले, आम्ही प्रशासनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करणार. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणार आहोत. कोरोना रोगाचे विघ्न या बाप्पाने संपवून कोरोनामुक्त करावं हिच श्री चरणी प्रार्थना आहे. 

संपादन -  सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mandal at Savli has brought Ganpati a day before