esakal | ..तर जिल्ह्यांतर्गत फिरताच येणार नाही; शासनाकडून E-pass सक्तीचा!

बोलून बातमी शोधा

E-pass
..तर जिल्ह्यांतर्गत फिरताच येणार नाही; शासनाकडून E-pass सक्तीचा!
sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : अत्यावश्‍यक कारणासाठी शहर, तसेच जिल्ह्यांतर्गत प्रवास सुलभ होण्यासाठी नागरिकांना ई-पास देण्यासाठी जिल्हा विशेष शाखेमध्ये स्वतंत्र ई-पास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा पास असल्याशिवाय नागरिकांना आता शहर, तसेच जिल्ह्यांतर्गत फिरता येणार नाही.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी शासनाने एक मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. या आदेशानुसार नागरिकांना संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये वैद्यकीय कारण, नातेवाईकाचे अंत्यसंस्कार किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या गंभीर आजारपणाच्या कारणासाठी प्रवास करण्यास सवलत देण्यात आली आहे. लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. शहर, तसेच जिल्ह्याच्या प्रवेश मार्गावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याठिकाणी नागरिक कशासाठी बाहेर पडलेत याची विचारणा केली जाणार आहे. अशावेळी नागरिकांकडे ठोस कारण सांगता येणे आवश्‍यक असते. या विचारण्यामध्ये वेळ जाऊ नये, तसेच वादावादीचे प्रसंग उद्‌भवू नयेत, यासाठी जिल्हा पोलिसांनी नागरिकांच्या सोयीसाठी ई-पास देण्याची सुविधा सुरू केली आहे.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा Oxygen Tanker पळवण्याचा डाव फसला; साताऱ्याचे 'सिंह'च ठरले जांबाज

ई-पास देण्यासाठी जिल्हा विशेष शाखेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली आहे. नागरिकांनी http://covid19.mhpolice.in या लिंकचा वापर करायचा आहे. त्यामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून आपली व आपल्या सहप्रवाशांची माहिती, प्रवासाचे कारण, प्रवास सुरू करण्याचे ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण याबाबतची माहिती व कागदपत्रांची पूर्तता करून ई-पाससाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ज्या नागरिकांना इंटरनेट सेवा, तसेच मोबाईलचा वापर करता येत नाही, ई-पास हवा असल्यास त्यांना प्रत्येक पोलिस ठाण्याकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात ई-पास मार्गदर्शन पथक निर्माण करण्यात आल्याची माहितीही निरीक्षक कुंभार यांनी दिली आहे. अशा नागरिकांना या पासशिवाय शहर व जिल्ह्यांतर्गत फिरण्यावर दहा हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

Edited By : Balkrishna Madhale