Satara
Satara

माणदेशी बळिराजाला आता "त्याची' प्रतीक्षा

Published on

बिजवडी (जि. सातारा) : कोरोना विषाणू संसर्गाच्या सावटाखाली माण तालुक्‍यात खरीप हंगामाच्या शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, शेतकरी वर्ग आता पेरणीसाठी वरुणराजाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. 

माण तालुक्‍यात मॉन्सूनचा पाऊस म्हणावा तसा पडत नाही. या तालुक्‍याला हक्काचा पाऊस म्हटलं तर परतीचा पाऊस. मात्र, येथील शेतकरी वर्षानुवर्षे मोठ्या धाडसाने मॉन्सूनमधल्या एखाद दुसऱ्या पावसाच्या धूळवाफेवर खरिपाची पेरणी करत असतो. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींवर व एखाद्या पावसावर हा हंगाम यशस्वी करत असतो. शेतकऱ्यांनी शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे ट्रॅक्‍टरसह बैलांच्या साह्याने पूर्ण केली आहेत. खते विस्कटून पाळ्या घालून शेतकरी वर्ग पेरणीपूर्व कामे करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. आता तो खरिपाच्या पेरणीसाठी फक्त एका चांगल्या पावसाची वाट पाहात आहे. 

गतवर्षी या भागाला वरुणराजाने सुरवातीला हुलकावणी दिल्यामुळे खरीप हंगामाची पिके शेतकऱ्यांच्या हाताला लागलेली नव्हती. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटामध्ये सापडलेला होता. उशिरा झालेल्या पावसामुळे खरीप पिकाच्या मशागती वाया गेल्या तर रब्बी पिकाने बळिराजाला कसबसे तारले. उन्हाळ्यामध्ये ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध होते, त्यांनी भाजीपाला व्यवसायाकडे लक्ष दिले. परंतु, पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात झालेल्या लॉकडाउनमुळे खासगी वाहतूक व बाजारपेठा बंद असल्याचा फटका बळिराजाला बसला. कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने टोमॅटो, वांगी, मेंथी, कोथिंबीर यांसारख्या नगदी पिकांचे तसेच कलिंगड, काकडीसारख्या उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. 

अशा प्रकारे उद्‌भवलेल्या संकटांना तोंड देत सावरण्यासाठी बळिराजा पुन्हा नव्या जोमाने खरीप पेरणीपूर्व मशागत करू लागला. या आठवड्यात झालेल्या तुरळक पावसामुळे खरीप पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कांद्याची लागणही सुरू केली आहे, तर एक पाऊस पडला की बहुतांश शेतकरीवर्ग मुख्य पीक असलेल्या बाजरीसह इतर पेरण्या करण्यास सज्ज झाला आहे. 


""गतवर्षीच्या उशिरा झालेल्या मॉन्सूनच्या आगमनामुळे खरीप तसेच रब्बी पिकांच्या मशागतीचा खर्चही निघाला नाही, तर सध्या कोरोनाने बाजारपेठा चालू-बंद राहिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आता सर्व मदार येणाऱ्या खरीप हंगामाच्या यशापयशावर आहे.'' 

-अर्जुन अवघडे, प्रगतशील शेतकरी, वावरहिरे, ता. माण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com