सोसायटी ठरावावरून राडा; राजकारणातील गुन्हेगारी मोडण्यात प्रशासन कुचकामी

सोसायटी ठरावावरून राडा; राजकारणातील गुन्हेगारी मोडण्यात प्रशासन कुचकामी

दहिवडी (जि. सातारा)  : मागील काही वर्षांत माणचे राजकारण एका वेगळ्याच वळणावर गेले आहे. माणची कष्टकरी जनता वारंवार त्याचा अनुभव घेत आहे. पानवण (ता. माण) येथील सोसायटी ठरावावरून झालेला राडाही त्याच दुर्दैवाचा एक भाग म्हणावा लागेल. माणच्या मातीतील राजकारणाला लागलेले हे गुन्हेगारीचे ग्रहण मोडण्यात प्रशासकीय यंत्रणाही पूर्णत: कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय माण माझा? असा प्रश्‍न माणदेशी जनेतच्या मनाची घुसमट करत आहे. 

माणमधील राजकारण हे कधीकाळी घरच्या भाकरी खाऊन करण्याचे व चन्याफुटाण्यावरचे होते. त्या वेळीही काही कुरबिरी नव्हत्या असे नाही; परंतु बहुतांश वेळी एकमेकांचा आदर, सन्मान करून निवडणुका लढवल्या जायच्या. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व विधानसभा या निवडणुकांवेळी राजकीय वातावरण तापायचे. मात्र, बाजार समिती, खरेदी- विक्री संघ, जिल्हा बॅंक या निवडणुका आल्या कधी अन्‌ झाल्या कधी हेच समजायचे नाही. दहशतीची पराकोटीची छाया मात्र, या राजकणारात कधीच नव्हती. गेल्या दहा ते 15 वर्षांत माणमधील राजकीय वातावरण पूर्णतः बदलून गेले. या गढूळ वातावरणाने माणच्या जनतेचे स्वास्थ्य हरवून गेले. 

जाणून घ्या : मेडिकल काेडिंगमधील करिअरची संधी

या सर्वांवर कहर होतो आहे तो जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडणुकीसाठी लागणाऱ्या सोसायटींच्या ठरावामध्ये. याच ठरावावरून 19 मार्च 2015 रोजी अभूतपूर्व राडा झाला होता. त्यानंतर पुन्हा विविध निवडणुकांत छोट्यामोठ्या कुरबुरी झाल्या. विधानसभा निवडणूक त्यामानाने शांततेत पार पडली; पण ही शांतता औटघटकेची ठरली. या वेळच्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा माणमधील वातावरण बिघडत चालले आहे. ठराव करण्यावरून धमकी, दमदाटी देण्याचे प्रकार सुरू झाले, तसेच ठराव झालेल्यांना पैशांचे आमिष दाखवून, धमकावून पळवून नेण्याचे प्रकार समोर येत आहेत. प्रत्येकाच्या मागे ससेमिरा आहे. 

या सर्वात मोठी चिंतेची बाब आहे ती हा सर्व गोंधळ खुलेपणाने घालणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात पोलिस व प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. एखाद्याने केलेल्या अन्यायाबद्दल न्याय मिळेल का, हाच सर्वात मोठा प्रश्‍न माणदेशी जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी अत्यंत टोकाच्या धमक्‍या व दबावाचे राजकारण झाल्याचे काही जण सांगतात. त्यामुळे माणदेशी जनतेचा स्वातंत्र्याचा अधिकार अस्तित्वात ठेवण्यासाठी प्रशासनाला वेळीच कठोर पावले उचलावी लागणार आहेत. अन्यथा माणला बिहारीची उपाधी लागण्यापासून कोणी बचावू शकत नाही. पोलिस व प्रशासनाने अशा प्रकारांचे गांभीर्य ओळखावे हीच अपेक्षा आहे. 

सामान्य जनता हतबल 

एका डॉक्‍टरच्या अपहरणाचा प्रकार रविवारी पानवणमध्ये समोर आला आहे. यालाही जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात नक्की सत्य काय ते लवकरच समोर येईल. प्रशासनाला ते आतापर्यंत जमलेले नाही म्हणा; पण तोपर्यंत माणच्या राजकारणाच्या या बदलेल्या परिस्थितीची चर्चा महाराष्ट्रात होणार आहे. या सर्व परिस्थितीला वैतागलेली सामान्य जनता मात्र हतबल झाली आहे. कायद्याच्या राज्यासाठी ही भूषणावह गोष्ट नाही. 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com