मान्याचीवाडीत घरोघरी दिवाळी साहित्यासह फराळ वाटपातून सरपंचांनी वाढविला गोडवा

राजेश पाटील
Saturday, 14 November 2020

गावचे पहिले दिवंगत आदर्श सरपंच (कै.) तात्यासाहेब माने यांच्या पावलांवर पाऊल ठेवत येथील प्रत्येक घटक गावच्या विकासात योगदान देत आहे. त्यामध्ये सरपंच रवींद्र माने यांचाही समावेश आहे.
 

ढेबेवाडी (जि.सातारा) : मान्याचीवाडी (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र माने यांनी आतापर्यंत मिळालेल्या सरपंच मानधनात आपल्या व्यवसायातीलही काही रक्कम घालून गावातील प्रत्येक कुटुंबाना दिवाळी साहित्य व फराळाचे किट नुकतेच भेट देऊन या गोड सणाची गोडी अधिकच वाढवली.
 
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची स्थापना 2001 मध्ये झाली. स्थापनेपासूनच रवींद्र माने या ग्रामपंचायतीत कार्यरत आहेत. आठ वर्षे सदस्य, पाच वर्षे उपसरपंच आणि सहा वर्षे सरपंच अशी त्यांची आतापर्यंतची कारकीर्द झालेली आहे. गेल्या 19 वर्षांत या ग्रामपंचायतीने 54 पुरस्कारांवर आपले नाव कोरले असून, बक्षीस रूपाने एक कोटी रुपयांवर कमाई केलेली आहे. गावचे पहिले दिवंगत आदर्श सरपंच (कै.) तात्यासाहेब माने यांच्या पावलांवर पाऊल ठेवत येथील प्रत्येक घटक गावच्या विकासात योगदान देत असून, त्यामध्ये सरपंच रवींद्र माने यांचाही समावेश आहे.

श्री. माने यांनी आतापर्यंत मिळालेले मानधन स्वतःसाठी न वापरता डिजिटल शाळा निर्मिती, शैक्षणिक साहित्य, तसेच प्रत्येक कुटुंबाला हापूस आंब्याचे रोप वाटप आदी उपक्रमांसाठी खर्च केले आहे. यंदा कोरोनाच्या वातावरणामुळे दिवाळीच्या सणावर आर्थिक मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीत गावातील प्रत्येक कुटुंबाला थोडासा हातभार देऊन दिवाळीचा गोडवा आणखीन वाढविण्यासाठी श्री. माने यांनी आपल्या खात्यावर जमा मानधनात व्यवसायातीलही काही रक्कम घालून गावातील प्रत्येक कुटुंबाला दिवाळी साहित्य व फराळाच्या किटचे नुकतेच वाटप केले.

आपल्यातलाच मुलगा आभाळाएवढा मोठा झाल्याने माथाडी कामगार भारावून गेले

त्यामध्ये लाडू- चिवडा, साबण, सॅनिटायझर, सुगंधी उटणे, तेल, धूप, पणत्यांचे पाकीट आदी वस्तूंचा समावेश होता. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास सरपंच माने, उपसरपंच अधिकराव माने, ग्रामविकास अधिकारी प्रसाद यादव, तंटामुक्तीचे अध्यक्ष दादासाहेब माने, सदस्या संगीता माने, लता आसळकर, पोलिस पाटील विकास माने, दिलीप गुंजाळकर, सर्जेराव माने, उत्तमराव माने, विठ्ठल माने, बबनराव माने आदींसह ग्रामस्थ महिला-पुरुष, युवक उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manyachiwadi Sarpanch Distributed Sweets In Village Diwali Festival 2020 Satara News