Market Committee Election : सोसायटीतून बाजार समितीसाठी साखरपेरणी

कऱ्हाडला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले
market committee society Election political atmosphere heated up Karhad
market committee society Election political atmosphere heated up Karhad

कऱ्हाड : येऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांच्या निवडणुकांना किंमत आली आहे. तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीची कार्यवाही सध्‍या सुरू आहे.

या निवडणुकीवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील ‘इफेक्ट’ दिसत आहे. या सोसायट्यांच्या निवडणुकीवर बाजार समितीतील सत्तेची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील मातब्बर नेत्यांनीही लक्ष केंद्रित केले आहे.

या सोसायट्यांच्या निवडणुकीतून बाजार समितीची साखरपेरणी सुरू असल्याचे सध्या तालुक्यात चित्र आहे. सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका या सुमारे दोन वर्षांहून अधिक काळ लांबल्या. कोरोनामुळे त्या पुढे गेल्या होत्या.

तालुक्यातील १११ सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचा टप्पा नुकत्याच पार पडला. त्या निवडणुकीत जिल्हा बॅंकेसाठीच्या निवडणुकीतील गटबाजीचा परिणाम दिसून आला. जिल्हा बॅंकेसाठी तत्कालीन सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ती निवडणूक महत्त्वाची होती.

त्यांच्या विरोधात सोसायटी गटातून अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची उमेदवारी होती. त्या मतदार संघावर गेली अनेक वर्षे माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकरांचे वर्चस्व होते. त्यामुळे लढत प्रतिष्ठेची बनली होती.

या निवडणुकीसाठी भाजपचे अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना मदतीचा हात दिला होता. त्यामुळे आमदार पाटील यांचा विजय सुकर झाला. त्या निवडणुकीत जुळलेली नवी समीकरणे गावोगावच्या नुकत्याच झालेल्या ९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही दिसून आली.

त्याचबरोबर त्याचा परिणाम नुकत्याच झालेल्या १११ सोसायट्यांच्या निवडणुकीतही स्पष्टपणे दिसला. तालुक्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात सोसायट्यांच्या निवडणुका असल्याने नेत्यांनीही त्यात लक्ष घातले होते. त्यानंतर सध्या तालुक्यातील ११ सोसायट्यांच्या निवडणुका लागल्या आहेत.

३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या सोसायट्यांचा त्यात सहभाग आहे. त्यामध्ये आटके, कार्वे ग्राम विकास, कोडोली, शेणोली, तुळसण, कोळेवाडी, जिंती, वारुंजी, जखिणवाडी, कऱ्हाड विकास सोसायटी, प्रियदर्शनी सोसायटी यांचा निवडणूक कार्यक्रम लागला आहे.

त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सत्ता आपल्याच गटाकडे यावी, यासाठी गाव पुढाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी या सोसायट्यांच्या पदाधिकारी, संचालकांचीही मते महत्त्वाची असल्याने नेत्यांनीही त्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. या सोसायट्यांसाठी शनिवारी (ता. १८) आणि रविवारी (ता. १९) मतदान होणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

केवळ तीनच दिवसात फैसला...

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शूत्र अथवा मित्र नसतो, याचे प्रत्यंतर निवडणूक लागलेल्या गावातील सोसायट्यांच्या लढतीतून दिसून येते. काही गावांत एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले तर काही गावात जे गट एकत्र होते ते त्यांनी स्वतंत्र पॅनेलद्वारे निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळे आता गावच्या सोसायटी कोणाच्या ताब्यात जाणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्याचा फैसला केवळच तीन दिवसांत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com