नरेंद्र पाटलांची महामंडळावरुन हकालपट्टी, माथाडी संघटना आक्रमक

राजेश पाटील
Thursday, 12 November 2020

अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून महामंडळाच्या कामकाजाने मोठी गती घेतली होती. महामंडळावरील संचालक मंडळाच्या नियुक्‍त्या अचानक रद्द केल्याने असंतोष वाढला आहे.

ढेबेवाडी (जि. सातारा) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना करून महामंडळाच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची सन्मानपूर्वक पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी, माथाडी कामगार व मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती युनियनकडून देण्यात आली. 

नरेंद्र पाटील अध्यक्ष असलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालक मंडळाच्या नियुक्‍त्या राज्य शासनाने रद्द केल्याने माथाडी संघटनेचे पदाधिकारी, माथाडी कामगार व मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी 1998 मध्ये युती शासनाच्या काळात अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने या महामंडळाची स्थापना करण्यात आली. 2016 मध्ये त्याच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून महामंडळाच्या कामकाजाने मोठी गती घेतली होती. महामंडळावरील संचालक मंडळाच्या नियुक्‍त्या अचानक रद्द केल्याने असंतोष वाढला आहे. नरेंद्र पाटील यांची सन्मानपूर्वक पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी युनियनचे पदाधिकारी, माथाडी कामगार व मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे युनियनकडून नुकतेच सांगण्यात आले. 

अण्णासाहेब पाटील संचालक मंडळ बरखास्त; नरेंद्र पाटलांना अशोक चव्हाणांवरची टीका भोवली

महामंडळाच्या योजना व लाभ सुरूच राहणार 

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्‍त्या रद्द केलेल्या असल्या, तरी महामंडळाच्या योजना व लाभार्थ्यांना देण्यात येणारा व्याज परताव्याचा लाभ निरंतर सुरूच राहील, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. पदाधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय दौरा करून महामंडळाच्या विविध योजनांतर्गत 19 हजारांवर लाभार्थ्यांना विविध बॅंकांमार्फत 1215 कोटींचे कर्ज वितरण केले आहे. महामंडळामार्फत 61 कोटींची व्याज लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल्याचे पत्रकात नमूद आहे, बॅंकांनी आतापर्यंत ज्याप्रमाणे सहकार्य केले, तसेच यापुढेही करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mathadi Organization Is Unhappy With The Cancellation Of Appointments On Annasaheb Patil Mahamandal Satara News