पदवीधरांच्या बेकारीला भाजपच जबाबदार : जयंत पाटील

प्रवीण जाधव
Saturday, 21 November 2020

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. त्या वेळी मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी तालुक्‍यांची जबाबदारी घेतली. शेवटी साताऱ्यातील कामाचा मुद्दा समोर आला. साताऱ्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारांची संख्या मोठी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

सातारा : संपूर्ण देशात भाजप सरकारविरोधात नाराजीचा सूर आहे. कारखानदारांनी तरुणांना कामावरून कमी करून उत्पादन निम्म्यावर आणले. त्याला मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. पदवीधरांच्या बेकारीलाही भाजपच जबाबदार असून, त्यांच्याविरोधात देशात व राज्यात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणावरही विसंबून न राहता मतदारापर्यंत पोचून जास्तीतजास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सातारा येथे केले. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, प्रभाकर देशमुख, सारंग पाटील, सत्यजित पाटणकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. सारंग पाटील यांना या निवडणुकीचा अनुभव आहे. त्यामुळे अरुण लाड यांच्या प्रचाराच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येत आहे, असे श्री. पाटील यांनी या वेळी जाहीर केले. विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याचा निर्णय महाआघाडी सरकारने घेतला आहे. राज्याच्या उत्पन्नाची साधने वाढवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी काम सुरू आहे. लवकर विविध योजना व विकासकामे सुरू होतील. पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांवर महाआघाडीचे सरकार सकारात्मक आहे. कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री पाटील, प्रा. बानुगडे पाटील, सारंग पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनील माने यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले. 

भाजपने पुण्यात मतदान वाढवले असल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करू : पाटील

दरम्यान, शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. त्या वेळी मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांनी तालुक्‍यांची जबाबदारी घेतली. शेवटी साताऱ्यातील कामाचा मुद्दा समोर आला. साताऱ्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारांची संख्या मोठी आहे. शहरात काय नियोजन आहे, असे ना. जयंत पाटील यांनी विचारले, त्या वेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांनी आघाडी सरकारच्या साताऱ्याबाबतच्या धोरणावर तोफ डागली. ते म्हणाले, ""सर्व 40 नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभागनिहाय प्रचारसाठी आजी-माजी नगरसेवकही कॉंग्रेस, राष्ट्रवादीत नाहीत. साताऱ्यात दीपक पवार किंवा आम्हाला विचारून निधी देता का? 100 कोटींचा निधी दिला, त्याप्रमाणे निवडणुकीचे कामही त्यांनाच करायला सांगितले पाहिजे.'' सातारा शहर व तालुक्‍यातील मतदारांसाठी अजितदादांकडून त्यांनाच फोन करायला सांगा, बाकी आम्ही शशिकांत शिंदे व दीपक पवार काम करूच, असा टोलाही अजित पवार व शिवेंद्रसिंहराजेंच्या सलगीवर नरेंद्र पाटील यांनी लगावला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting Of NCP Congress And Shivsena At Satara On The Backdrop Of Pune Graduate Elections Satara News