कारखान्यांमुळे वाहतूक कोंडी; प्रतिनिधींनी तत्काळ पुढाकार घ्यावा, प्रांताधिकाऱ्यांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारखान्यांमुळे वाहतूक कोंडी; प्रतिनिधींनी तत्काळ पुढाकार घ्यावा, प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

कोरेगाव शहरातून, तसेच तालुक्‍यातील मोठ्या गावांतून होत असलेल्या ऊस वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघात देखील होत आहेत. त्यासाठी वाहतूकदारांना शिस्त लावण्याचे काम साखर कारखानाच्या प्रतिनिधींनीच केले पाहिजे, असे आवाहन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.

कारखान्यांमुळे वाहतूक कोंडी; प्रतिनिधींनी तत्काळ पुढाकार घ्यावा, प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

कोरेगाव (जि. सातारा) : साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीमुळे कोरेगाव शहरासह तालुक्‍यातील रहिमतपूर, वाठार स्टेशन आणि सातारारोड येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी, अपघातांच्या घटना घडत असून, यासंदर्भात सुरक्षिततेचे नियम तयार करून त्यासाठीच्या कार्यवाहीबाबत साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आदेश प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी दिले. 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम, ऊस वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत प्रांताधिकारी पाटील यांनी वरील सूचना दिल्या. याप्रसंगी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रितू खोखर, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहायक निरीक्षक स्वप्नील घोंगडे, मोटार वाहन निरीक्षक एम. एन. पाटील, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे आदींसह अधिकारी व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रांताधिकारी पाटील म्हणाल्या, "कोरेगाव शहरातून, तसेच तालुक्‍यातील मोठ्या गावांतून होत असलेल्या ऊस वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघात देखील होत आहेत. त्यासाठी वाहतूकदारांना शिस्त लावण्याचे काम साखर कारखानाच्या प्रतिनिधींनीच केले पाहिजे. आठवडा बाजारादिवशी म्हणजेच सोमवारी आणि गुरुवारी कोरेगावात होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी जास्तीतजास्त ऊस वाहतूक करता येऊ शकते का? याबाबत सर्वच कारखान्यांच्या प्रतिनिधींनी एकत्रित बसून चर्चा करावी आणि वाहतूक आरखडा कसा असेल, वाहतूक कशा पद्धतीने वळवली जाईल, याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा.'' 

अण्णासाहेब पाटील संचालक मंडळ बरखास्त; नरेंद्र पाटलांना अशोक चव्हाणांवरची टीका भोवली

रहिमतपूर, वाठार स्टेशन, सातारारोड येथेही आठवडा बाजारादिवशी ऊस वाहतुकीमुळे खोळंबा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मुख्य मार्गांवर कोरेगाव शहराच्या आणि मोठ्या गावांच्या बाजारपेठा आहेत. कारखान्यांच्या प्रतिनिधींनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून ऊस वाहतूक विनाविलंब होण्यासाठी समन्वयाने मार्ग काढण्याची आवश्‍यकता असल्याचे मत तहसीलदार अमोल कदम यांनी व्यक्त केले.

कापूस उत्पादकांनाे! थांबा हमी भाव खरेदी केंद्रच फलटणला आणताे : रामराजे नाईक-निंबाळकर

या वेळी झालेल्या चर्चेत जरंडेश्‍वर शुगर मिल्सचे कार्यकारी संचालक विजय जगदाळे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे रहिमतपूर विभाग अधिकारी कदम यांनी भाग घेतला. सह्याद्री आणि जरंडेश्‍वर साखर कारखान्यांची गाळप क्षमता लक्षात घेता, उसाची आवक होणे गरजेचे आहे. ऊस वाहतूक थांबविणे हे या प्रश्‍नावरील उत्तर नाही, वाहतूक व्यवस्थेत कशा पद्धतीने बदल करता येऊ शकतो, याबाबत आम्ही पाहणी करू, साखर कारखान्यांकडे अतिरिक्त ऊस असेल, त्या वेळी आम्ही रात्रीच्या वेळी ऊस वाहतुकीचा निर्णय घेऊ शकतो. मात्र, प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात. साखर कारखाना, साखर उद्योग, हे दोन्ही प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उभारलेले आहेत. कारखान्यांबाबत कोणताही निर्णय घेतला, तरी त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असतो. त्यामुळे सक्तीने कोणतेही निर्णय घेऊ नयेत, अशी विनंती जगदाळे यांनी या वेळी केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top