पुणे पदवीधर निवडणुकीत आळशीपणा नको : रामराजे

किरण बोळे
Saturday, 21 November 2020

उमेदवार अरुण लाड यांच्या घराला वैचारिक असा वारसा आहे. क्रांतीअग्रणी जे. डी. बापू लाड यांचे ते चिरंजीव आहेत. वैचारिक परंपरा असलेल्या घरातील अरुण लाड यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहावे, असे आवाहन रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

फलटण शहर (जि. सातारा) : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांना मतदान करून घेण्यासाठी नियोजनपूर्वक यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यामध्ये गाफिल राहून चालणार नाही. या निवडणुकीचे महत्त्व माझ्या दृष्टीने वेगळे आहे. संपूर्णतः सातारा जिल्हा व तालुक्‍यांवर माझे पूर्ण लक्ष राहणार असून, आळशीपणा व बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला. 

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित पदवीधर संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, किरण लाड, डी. के. पवार, नगराध्यक्षा नीता नेवसे, कॉंग्रेसचे नेते सचिन सूर्यवंशी-बेडके आदींची या वेळी उपस्थिती होती. 

भाजपने पुण्यात मतदान वाढवले असल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करू : पाटील

उमेदवार अरुण लाड यांच्या घराला वैचारिक असा वारसा आहे. क्रांतीअग्रणी जे. डी. बापू लाड यांचे ते चिरंजीव आहेत. वैचारिक परंपरा असलेल्या घरातील अरुण लाड यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहावे, असे आवाहनही रामराजे नाईक- निंबाळकर यांनी केले. पूर्वी या निवडणुकीत ठराविक पक्षाचे वर्चस्व होते; परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. फलटण शहर व तालुक्‍यात मिळून एकंदरीत नऊ हजार मतदान आहे. संजीवराजे यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदार मोठ्या संख्येने आहेत. जे मतदार बाहेर आहेत त्यांच्याकडून मतदान करून घ्यावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भीमदेव बुरुंगले यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद नेवसे यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting Of Speaker Ramraje Naik-Nimbalkar At Phaltan Satara News