मुरूम उत्खननात लाखोंची तडजोड; खर्शीत 'महसूल'चा काळाबाजार

प्रशांत गुजर
Thursday, 29 October 2020

वाई तालुक्‍यातील ठेकेदार गणपती माळावरून केवळ 30 ब्रास मुरूम उत्खनन करण्याचा परवाना घेऊन अंधाऱ्या रात्रीचा फायदा उठवून जावळीसह वाई तालुक्‍यातील अनेक गावांत मुरूम पोच करत होता. त्यासाठी त्याने या भागातील काही ट्रॅक्‍टर भाडेतत्त्वावर घेतले होते. याची माहिती स्थानिकांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिली होती. ही माहिती मिळताच महसूलचे कर्मचारी घटनास्थळी पोचले.

सायगाव (जि. सातारा) : जावळी व वाई तालुक्‍यांच्या सीमेवर असलेल्या खर्शी तर्फे कुडाळ येथील गणपती माळावर शनिवारी (ता. 24) रात्री अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टर व जेसीबीवर कुडाळ पोलिसांनी छापा टाकला. मात्र, संबंधित विषय हा महसूल विभागाचा असल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र, त्यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा न करता लाखो रुपयांची तडजोड करून प्रकरण मिटवून वाहने सोडून दिल्याची चर्चा रंगली आहे. 

वाई तालुक्‍यातील एका ठेकेदार गणपती माळावरून केवळ 30 ब्रास मुरूम उत्खनन करण्याचा परवाना घेऊन अंधाऱ्या रात्रीचा फायदा उठवून जावळीसह वाई तालुक्‍यातील अनेक गावांत मुरूम पोच करत होता. त्यासाठी त्याने या भागातील काही ट्रॅक्‍टर भाडेतत्त्वावर घेतले होते. याची माहिती स्थानिकांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिली होती. ही माहिती मिळताच महसूलचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. मात्र, परावान्यापेक्षा जास्त झालेल्या उत्खननाचे पंचनामे करण्यात आलेच नाहीत. परवाना 30 ब्रासचा असताना उत्खनन हजारो ब्रासचे झाले असूनही महसूल कर्मचारी व संबंधित ठेकेदार यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये लाखो रुपयांत प्रकरण दाबन्यात आल्याची चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. 

कऱ्हाडला चोवीस तास पाणीयोजना पूर्णत्वास; तांत्रिक कामे, निविदांची प्रक्रियाही पूर्ण

केवळ 100 ब्रास जादा उत्खनन झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. पकडलेले चार ट्रॅक्‍टर व दोन जेसीबी वाहने शनिवारच्या रात्रीच लाखो रुपयांत सोडून देण्यात आली. या लाखोंच्या तडजोडीमध्ये आणखी किती जणांना आणि किती मलई पोचली याबाबत चर्चा रंगली आहे. जावळीचे नूतन तहसीलदार आर. आर. पोळ या उत्खननप्रकरणी काय कारवाई करणार? संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर अवैध उत्खननाचा दंड ठेवणार, की संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून उत्खननामध्ये वापरली गेलेली वाहने जप्त करणार? याची उत्सुकता जनतेमध्ये दिसून येत आहे. 

साता-यात स्टेट बॅंकेला सव्वादोन लाखांचा गंडा; टाेळी पुन्हा सक्रिय?

पाटील यांची बदली होताच तोडपाणी सुरू! 

तहसीलदार शरद पाटील यांच्या कार्यकाळात महसूल विभागाचा अवैध धंद्यांवर मोठा वचक होता. त्यांच्या पारदर्शक कामामुळे महसूलमधील अनेकांचा टेबलाखालचा महसूल बंद पडलेला होता. मात्र, श्री. पाटील यांची बदली होतच अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तोडपाणी करण्यास सुरुवात केल्याचे यानिमित्ताने दिसून येऊ लागले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions compromised in excavation at Kharshi Satara News