वीटभट्टी व्यावसायातील करोडोंची उलाढाल ठप्प, मालकांसह कामगारांवर आर्थिक संकट

Satara
Satara
Updated on

उंब्रज (जि. सातारा)  : कोरोना विषाणूमुळे काही दिवस सर्व उद्योग, व्यवसाय अक्षरश: बंद आहेत. येथील करोडो रुपयांची उलाढाल असलेला वीटभट्टी व्यवसायही कोरोनामुळे अडचणीत आलेला आहे. त्यामुळे व्यवसायिकांसह कामगार आर्थिक संकटात आले आहेत. 

येथील विटेला चांगली मागणी असल्याने बाहेरील जिल्ह्यांतील बांधकाम व्यावसायिकांना पुरवली जाते. उंब्रजसह परिसरात 60 ते 70 वीटभट्टी व्यावसायिक आहेत. परंतु, कोरोनामुळे गेले तीन महिने हा व्यवसाय बंद पडल्याने वीटभट्टी मालक आर्थिक अडचणीत आला आहे. कष्टकरी जनतेला हमखास रोजगार मिळून देणारा वीटभट्टी व्यवसाय मंदीच्या सावटात असून, डबघाईला आला आहे. कोरोनामुळे यंदा कमी माल तयार झाला असून, मागणीही घटली आहे. त्यातच तीन महिने अगोदर वीटभट्टी बंद झाल्याने कामगारांना दिलेली उचलही फिटली नाही. तर वीटभट्टीवरील कामगारांना कोरोनामुळे लवकर घरी पाठवण्यात आल्याने मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे वीटभट्टी व्यवसायास मंदीच्या सावटाने घेरलेले आहे. 

वीटभट्टीवर काम करण्यासाठी येथे कर्नाटकसह इतर राज्यांतून अनेक कष्टकरी लोक येतात. एका वीटभट्टीमुळे साधारण दहा कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असतो. ते बयाणा म्हणून वीट व्यावसायिकांकडून आगाऊ उचल घेतात. एवढेच नव्हे तर घरदुरुस्ती, मयत, घरगुती कार्यक्रम, लग्नसमारंभ, दवाखाना यांसारख्या अडचणीच्या वेळी मदत म्हणून वीटभट्टीचे मालक सदर मजुरांच्या गरजा भागवतात. परंतु, मागील काही काळापासून हा व्यवसाय धोक्‍यात आल्याने गरीब, कष्टकरी वनवासी मजुरांना याची झळ पोचताना दिसत आहे. सर्वच बाजूने हा व्यवसाय कात्रीत सापडला आहे. उंब्रज येथे मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय असून, वरील कारणांमुळे परवडेना झाला आहे. तरीही इतर काही काम करता येत नसल्याने हा व्यवसाय करणे भाग असल्याचे वीटभट्टी मालक सांगत आहेत. 


व्यवसायासमोरील आव्हाने... 

सरकारने मातीची गौणखनिज रॉयल्टी अनेक पटीने वाढवली आहे. भट्टी धंद्यात महत्त्वाचे असणारे बगॅस व कोळशाचे दरही वाढले आहेत. मातीचे दरही वाढले आहेत. वरून फोम विटांच्या वापरामुळे पारंपरिक मातीच्या विटांचा उठाव कमी झाला आहे. शिवाय अवकाळी पाऊस, असंघटित कामगार, कामगारांच्या मजुरीत झालेली वाढ त्यातच यंदा आलेले कोरोनाचे संकट यामुळे वीटभट्टी व्यवसायच धोक्‍यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com