झोपलेल्या सरकारला जाब विचारणार; आठवलेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

अशोक सस्ते
Thursday, 22 October 2020

परतीच्या पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाणी साचून पिके कुजून चालली आहेत. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्राकडे मी स्वत: पाठपुरावा करुन मोठा निधी उपलब्ध करणार आहे. शेतक-यांच्या नुकसानीकडे राज्य शासनाने डोळेझाक केली असून याचा जाबही सरकारली विचारणार असल्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी फलटण दौ-यात सांगितले.

आसू (जि. सातारा) : परतीच्या पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाणी साचून पिके कुजून चालली आहेत. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्राकडे मी स्वत: पाठपुरावा करुन मोठा निधी उपलब्ध करणार आहे. शेतक-यांच्या नुकसानीकडे राज्य शासनाने डोळेझाक केली असून या झोपलेल्या सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (ता. २२) फलटण तालुक्‍याच्या पूर्व भागातील गोखळी, खटकेवस्ती येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. बारामती-गोखळी सीमेवर गोखळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच रंजना जाधव, अभिजीत जगताप, डॉ. गणेश गावडे यांनी मंत्री आठवले यांचे स्वागत केले. दरम्यान, मंत्री आठवले यांनी आज दुपारी गोखळी येथील गट नंबर 420 मधील सुवर्णा शांताराम जाधव व गट नंबर 543 मधील हणमंत ज्ञानदेव गावडे यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी पिकाची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. या वेळी भाजपाचे फलटण विधानसभा संपर्कप्रमुख बजरंग गावडे यांनी तालुक्‍यात अतिवृष्टीने ऊस, कापूस, बाजरी, मका आदी शेती पिकांसह पूरामुळे पूलांच्या नुकसानीची माहिती दिली. 

शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; सरकारविरोधात दरेकर, शिवेंद्रसिंहराजे आक्रमक

आठवले म्हणाले, रिपाइं व भाजपा सातत्याने शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरत आहे. पण, सध्याच्या या सरकारला शेतक-यांविषयी काही देणे घेणे नाही, असा टोलाही आठवलेंनी राज्य सरकारला लगावला. आठवले एकनाथ खडसेंविषयी बोलताना म्हणाले, एकनाथ खडसेंसोबत पंधरा-सोळा आमदार असणार नाहीत. सध्या आमदार नसल्यामुळे राष्ट्रवादी त्यांना पहिल्यांदा आमदार करतील आणि नंतर त्यांना मंत्रिपद मिळू शकते. खडसेंनी पक्ष बदलायला नको होता. आरपीआयमध्ये यायला पाहिजे होते, असे ते म्हणाले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असेही शेवटी त्यांनी सांगितले. 

उदयनराजेंचे सूचक विधान लवकरच चांगले घडेल, फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील

या वेळी पिंटू जगताप, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव विजय येवले, तालुकाध्यक्ष संजय निकाळजे, मुन्ना शेख, सतीश अहिवळे, शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, राजू मारूडा, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, महिला आघाडीच्या विमलताई काकडे, मीनाताई काकडे, रामचंद्र गावडे,अक्षय गावडे यांनी स्वागत केले. या वेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसिलदार संजय यादव, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक सावंत, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, मंडलकृषी अधिकारी भरत रणवरे, मंडलधिकारी महेंद्र देवकाते आणि शेतकरी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Ramdas Athavale Criticizes The State Government Satara News