
'वर्दीवर टोपी घालायला लाज वाटते, स्वत:ला हिरो समजता'
सातारा : शासकीय लवाजमा बाजूला ठेवत ग्रामीण गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी दुचाकीवरून फेरफटका मारत सातारा शहर पोलिस (Satara City Police) ठाण्यास भेट दिली. भेटीदरम्यान त्याठिकाणी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्यांनी विविध विषय, गुन्हे यांची माहिती घेत कामचुकारी करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी नगरसेवक बाळू खंदारे (Corporator Balu Khandare) याच्यावर दाखल असणाऱ्या गुन्ह्याच्या तपासातील ढिलाईबाबत अधिकाऱ्यांचे कान उपटत कारवाईचे संकेत दिले.
काल (सोमवारी) दुपारी १२ च्या सुमारास ग्रामीण गृह राज्यमंत्री देसाई हे त्यांच्या पोवई नाका येथील कोयना दौलत या निवासस्थानातून शासकीय लवाजमा न घेता दुचाकीवरून बाहेर पडले. नंतर श्री. देसाई हे दुचाकी घेऊन पोवई नाका व तिथून सातारा शहर पोलिस ठाण्यात आले. येथे आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्याची पाहणी करत उपस्थित पोलिस कर्मचारी, अधिकारी यांची विचारपूस केली. यानंतर त्यांनी ठाणाधिकाऱ्यांच्या खुर्चीत ठाण मांडत पंधरा दिवसांत घडलेले गुन्हे व गुन्हेगारांवर काय कारवाई केली, याबाबतची माहिती घेतली. याच वेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात आल्याचा मेसेज वायरलेसवरून देण्यास सांगितले. जिल्हा बँक अर्ज भरणी प्रक्रियेत वरिष्ठ अधिकारी गुंतल्याने त्यांनी उपस्थितांकडून माहिती घेत फरारी नगरसेवक खंदारेच्या गुन्ह्याची चौकशी करत तो का सापडत नाही, याबाबतची विचारणा केली.
याच वेळी त्यांनी गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यालाच बोलावून घेतले. खंदारे का सापडत नाही, त्याच्या साथीदारांना जामीन कसा झाला, याबाबतचे प्रश्न विचारत त्याचा सविस्तर अहवाल देण्यास सांगितले. गेले काही दिवस शहर पोलिसांच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये चुकीच्या चर्चा सुरू असल्याने मला हे करावे लागत असल्याचे सांगत श्री. देसाई यांनी चुकीचे काम करणाऱ्यांवर मला खात्यांतर्गत कारवाई करावी लागेल, अशी तंबीही त्यांनी या वेळी दिली. शंभूराज देसाई यांच्या आक्रमकतेमुळे पोलिस दल हादरले असून, त्यांना आपला चेहरामोहरा उजळण्यासाठी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.
वर्दीवर टोपी घाला
भेटीदरम्यान त्यांना शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर शासकीय टोपी नसल्याचे दिसून आले. यामुळे संतापलेल्या श्री. देसाई यांनी वर्दीवर टोपी घालत जा, लाज वाटते का, का स्वत:ला हिरो समजता, अशा शब्दात पोलिस कर्मचाऱ्यांचे कान उपटले.