esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Makarand Patil
चोऱ्या हे करणार अन्‌ बोटे आमच्याकडे दाखवणार, या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत.

बारामतीच्या घशात कारखाना घालण्याचा प्रचार केला जातोय : आमदार पाटील

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : खंडाळ्याचा साखर कारखाना (Khandala Sugar Factory) खंडाळ्याच्या मालकीचा कधी होता? वाईच्या नेत्यांच्या दावणीला हा कारखाना बांधून खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची या कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांनी दिशाभूल केल्याचा घणाघात आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांनी ज्‍येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर केला.

खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी काल पारगाव येथे मयूर मंगल कार्यालयात आमदार पाटील व व्ही. जी. पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी विकास परिवर्तन पॅनेल’ च्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त झालेल्या जाहीर प्रचार सभेत आमदार पाटील बोलत होते. या वेळी खंडाळा साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष व ज्ञानदीप परिवाराचे संस्थापक व्ही. जी. पवार, ज्‍येष्ठ नेते बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे खंडाळा तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जिल्हा काँग्रेसचे चंद्रकांत ढमाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मनोज पवार, अॅड. शामराव गाढवे, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, माजी सभापती एस. वाय. पवार, रमेश धायगुडे-पाटील, जिल्हा कोविड समन्वय समितीचे सदस्य डॉ. नितीन सावंत, हणमंतराव साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, ‘‘‘खंडाळा कारखाना उभा करण्यासाठी जेवढा खर्च आला, त्यापेक्षा अधिक पटीने कारखान्याच्या मानगुटीवर कर्जाचा बोजा करून ठेवला आहे. आज खंडाळा कारखान्यावर २५० कोटींचे कर्ज आहे. खंडाळा कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांचा वडिलधारी व माझ्या वडिलांचे मित्र म्हणून आदर आहे. आमच्याकडून अनादर होणार नाही, ती आमची संस्कृतीही नाही. मला या कारखान्याचे अध्यक्ष व्हायचे नाही. ऊस गेला नाही, बिले मिळाली नाहीत, साखर मिळाली नाही, येथील शेतकरी सातत्याने माझ्याकडे तशा तक्रारी करत होते.

लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्या तक्रारींची दखल घेण्याची माझी जबाबदारी आहे. त्यामुळेच मी कारखान्याकडे लक्ष घातले आहे. बारामतीच्या घशात हा कारखाना घालण्याचा प्रचार केला जातोय. मात्र, विरोधच करायचाच असता तर गेल्या वर्षी ३२ कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळाल्यावर किसन वीर भुईंज कारखाना डिसेंबरमध्ये सुरू झाला. त्यावेळीच हे पैसे मिळून दिले नसते. किसन वीर, खंडाळा व प्रतापगड मिळून एक हजार १५ कोटींचे कर्ज आहे. त्यामध्ये किसनवीरवर ७५० कोटी तर खंडाळ्यावर २५० कोटींचे कर्ज आहे. कामगारांचे पगार, हजारो शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत.’’ हा कारखाना खासगी कारखानदारांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. वार्षिक अहवालात ६० कोटींची अनामत ठेव रक्कम आली कोठून, असा प्रश्न पडला. त्यावेळी ती ठेव एका खासगी उद्योगपतीने ठेवल्याचे समोर आले. चोऱ्या हे करणार अन्‌ बोटे आमच्याकडे दाखवणार, या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. भविष्यात हा कारखाना सुरळीत चाललेला दिसेल, चांगला दरही मिळेल, असे सांगून आमदार पाटील यांनी शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही केले.

हेही वाचा: 'आमची निष्‍ठा सुरुचीवरच; तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल'

व्ही. जी. पवार म्हणाले, ‘‘कारखान्याचा उपाध्यक्ष असताना कधी विश्वासात घेतले नसल्याचा मनस्ताप झाला. कारखाना कसा चालवायचा, याची त्यांच्याकडे तरतूद नाही. तालुक्याचा कारखाना वाचला पाहिजे, तो खंडाळ्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहिला पाहिजे, या भूमिकेतून मकरंद आबांसोबत जाण्याचा माझ्यासह विद्यमान आठ संचालकांनी निर्णय घेतला.’’ नितीन भरगुडे-पाटील, चंद्रकांत ढमाळ, उदय कबुले, अजय भोसले, मयूर भोसले, राजेंद्र भोसले यांची भाषणे झाली. मनोज पवार यांनी प्रास्ताविक केले. बाबा लिम्हण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचे उमेदवार चंद्रकांत ढमाळ, दत्तानाना ढमाळ, अशोक गाढवे, नितीन भरगुडे -पाटील, विष्णू तळेकर, राजेंद्र तांबे, किसन धायगुडे, रमेश धायगुडे, व्ही. जी. पवार, ज्ञानेश्वर भोसले, साहेबराव कदम, हणमंतराव साळुंखे, धनाजी अहिरेकर, किसन ननावरे, शिवाजीराव शेळके-पाटील, गजानन धुमाळ, रत्नकांत भोसले, शोभा नेवसे, शालिनी पवार, सुरेश रासकर आदी उपस्‍थित होते.

हेही वाचा: सगळी नौटंकी सुरू आहे, म्हणून दुचाकीवरुन फिरावं लागतंय

loading image
go to top