शिवसेनेच्या आमदाराचा हिशोब चुकता करणार; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा थेट इशारा I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar NCP Political News

Political News : शिवसेनेच्या आमदाराचा हिशोब चुकता करणार; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा थेट इशारा

सातारा : शिंदे, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी निःपक्षपणे काम करण्याऐवजी एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे सूडबुद्धीने वागत आहेत, असा आरोप आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला.

सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ही मंडळी काम करत असून, या विरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या गुरुवारी (ता. २३) राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध लाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या वेळी अधिकाऱ्यांचा पुराव्यांसह पोलखोल करणार असल्याचा इशाराही आमदार शिंदेंनी पत्रकार परिषदेत दिला.

या वेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, गोरखनाथ नलवडे, तेजस शिंदे, अतुल शिंदेंसह युवकचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्यात राजकारण विरहित वातावरण होते. मात्र, सत्ता बदलानंतर सहा, सात महिन्यांत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह इतर सर्व अधिकारी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखे वागत आहेत. ते कोणाच्या दबावाखाली काम करतात, हे पुराव्यासह उघडकीस आणणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता बॉम्बे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा लाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

भंगार चोरणाऱ्यांशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे

मेडिकल कॉलेजच्या भंगार चोरीबाबत एक महिन्यात कारवाईचे आश्वासन देऊनही अद्याप कोणी गुन्हा दाखल करायचा यातच सर्व अडकून पडले आहे. भंगार चोरणाऱ्यांशी या अधिकाऱ्यांशी साटेलोटे आहे. शासकीय अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करतात, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे, असंही शिंदे म्हणाले.

'वाईट प्रवृत्ती हटवण्यासाठी निवडणूक लढणार'

शेतकऱ्यांची कर्जमाफीचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. शेतकऱ्यांची वीज तोडणे केली जात आहे. वीज वितरणकडे डीपींची कमतरता आहे. नोकरभरतीकडे दुर्लक्ष झालेले आहे. या सर्व बाबींवर आवाज उठविला जाणार आहे. प्रशासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या हातातील कटपूतली झाले आहेत. सूडबुद्धीने अधिकारी पूर्णपणे एकतर्फी वागत आहेत. हा जिल्ह्याचा मोर्चा आहे. कोरेगावमधून वाईट प्रवृत्ती हटविण्यासाठी आगामी काळात लढणार असल्याचे आमदार शिंदेंनी सांगितले.

हिशोब चुकता करणार

खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपणास अनेकदा संधी दिली. आपणही पक्षासाठी नेहमी झटत राहिलो. यापुढेही कोणी कितीही अडचणी आणल्या तरी न डगमगता कोरेगाव विधानसभा मतदारसंघातूनच पुन्हा ताकदीने लढून महेश शिंदे (Mahesh Shinde) यांचा हिशोब चुकता करणार असल्याचा इशाराच आमदार शिंदे यांनी या वेळी दिला.