मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया लवकरच; आमदार शिवेंद्रसिंहराजेंची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Shivendraraje Bhosale

आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्‍या पाठपुराव्यातून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने सातारा मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आहे.

मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया लवकरच; आमदार शिवेंद्रसिंहराजेंची माहिती

सातारा : सातारा मेडिकल कॉलेजला (Satara Medical College) मंजुरी मिळाली असून कॉलेजची इमारत बांधणी प्रक्रिया सुरु आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत पानमळेवाडी येथील सावकार कॉलेजमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सातारा वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. या इमारतीची आणि कॉलेजसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधांची पाहणी आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांनी केली. पाहणीअंती त्‍यांनी मेडिकल कॉलेजचे प्रथम वर्ष यंदापासून सुरु होतील, असा विश्वास व्यक्त केला. (MLA Shivendraraje Bhosale Informed Admission Of Medical College Start Will Soon)

आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्‍या पाठपुराव्यातून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या सहकार्याने सातारा मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आहे. यासाठी ६२ एकर जागा देत ४९५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मंजूर केलेल्‍या जागेवर कॉलेजसाठीची इमारत बांधण्‍यात येणार असून यंदा प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु व्‍हावी, यासाठी मेडिकल कॉलेजचे कामकाज तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात पानमळेवाडी येथील सावकार कॉलेजच्या इमारतीत सुरु होणार आहे. या इमारतीची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या पथक पाहणी करणार असून त्‍यापुर्वीं त्‍या इमारतीची पाहणी आज शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

यावेळी त्‍यांच्‍यासोबत मेडिकल कॉलेजचे डॉ. संजय गायकवाड, निशांत गवळी, कॉलेजचे प्राध्यापक डॉ. विजय झाड, डॉ. रचना शेगडे, डॉ. दीपक थोरात आदी उपस्थित होते. कॉलेजचे प्रथम वर्ष सुरु होण्यासाठी संगणक व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी जिल्हा बँकेने कॉलेजला १५ लाख रुपये मदत दिली होती. त्‍यांनी दिलेल्‍या निधीतून खरेदी केलेले साहित्य तसेच हॉल, प्रयोगशाळा, ग्रंथालय, विध्यार्थी बैठक व्यवस्था, रुग्णालय आदींची पाहणी करत आवश्यक त्या सूचना संबंधितांना केल्या. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या पाहणीनंतर प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होईल आणि सातारा मेडिकल कॉलेज सुरु होईल, असा विश्‍‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.

MLA Shivendraraje Bhosale Informed Admission Of Medical College Start Will Soon