esakal | शाहूपुरी पाणी योजनेचे काम त्वरित पूर्ण करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूपुरी पाणी योजनेचे काम त्वरित पूर्ण करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

शाहूपुरी पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून पूर्वीच ३१.३१ कोटी निधी मंजूर झाला होता. सध्या या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, उर्वरित पाईपलाइनचे काम, टाक्या, नळजोडणी आदीसाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक होते. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी शाहूपुरी येथील सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळवून १२ कोटी रुपये निधी मंजूर करुन घेतला.

शाहूपुरी पाणी योजनेचे काम त्वरित पूर्ण करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : शाहूपुरीवासीयांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सुटण्यासाठी शाहूपुरीच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव १२ कोटी रुपये निधी नुकताच मंजूर करुन घेतला आहे. वन विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या अडचणीबाबत संबंधित अधिकार्‍यांनाही सूचना केल्या आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यासाठी कोणतीही अडचण राहिली नाही. त्यामुळे शाहूपुरी पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरु करा आणि ते लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पल्लवी चौगुले यांना केल्या. तसेच शाहूनगर त्रिशंकू भागाचा समावेश नगरपालिका हद्दीत झाला असल्याने या भागाचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी नवीन योजनेचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याची सूचनाही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केली.

शाहूपुरी पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून पूर्वीच ३१.३१ कोटी निधी मंजूर झाला होता. सध्या या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, उर्वरित पाईपलाइनचे काम, टाक्या, नळजोडणी आदीसाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक होते. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी शाहूपुरी येथील सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळवून १२ कोटी रुपये निधी मंजूर घेतला. आता हे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी प्राधिकरण कार्यालयात जावून श्रीमती चौगुले यांची भेट घेतली आणि योजनेचा आढावा घेतला. यावेळी शाहूपुरीचे भारत भोसले, पिंटू कडव, बबलू जाधव, राजेंद्र मोहिते, विकास देशमुख, तुषार जोशी, पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण, फिरोज पठाण, कॉन्ट्रक्टर दीपक भिवरे, दरे ग्रामपंचायतीचे सरपंच माने आदींसह शाहूपुरी आणि शाहूनगर येथील नागरिक उपस्थित होते.

कास - बामणोली रस्त्यावरील पूलाचे काम लवकरच : उदयनराजे 

शाहूपुरी सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना जलवाहिनी टाकताना काही जागा वनविभागाची येत आहे. त्यासंदर्भात परवानगी मिळण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी वन विभागाचे प्रवीण हाडा यांना त्याच ठिकाणाहून फोन करुन त्वरित परवानगी देण्याच्या सूचना केल्या. तसेच योजनेसाठी लागणार्‍या एक्सप्रेस फिडरसाठीही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना फोनवरुन सूचना दिल्या. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे योजनेचे काम तातडीने सुरु करा आणि लवकरात-लवकर काम मार्गी लावा. तसेच नागरिकांना कनेक्शन ट्रान्सफर आणि नवीन नळ कनेक्शन द्या, अशा सूचनाही शिवेंद्रसिंहराजे यांनी चौगुले यांना केल्या. येत्या तीन चार दिवसांत काम सुरु करुन लवकर योजना कार्यान्वित करु, असे चौगुले म्हणाल्या.

सरकारविरोधात दरेकर, शिवेंद्रसिंहराजे आक्रमक

शाहूनगर या त्रिशंकू भागाचा समावेश नगरपालिकेत झाला आहे. त्यामुळे येथील निकष बदलला असून प्रती मानसी १४० लिटर पाणी यानुसार नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी फेरप्रस्ताव तययार करा. नवीन प्रस्ताव त्वरित तयार करुन मंजुरीसाठी शासनाकडे पाठवा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या. १५ दिवसांत प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याचे श्रीमती चौगले यांनी यावेळी सांगितले. दरे ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

loading image