सलग तिस-या दिवशी खासदार श्रीनिवास पाटलांनी संसदेत साता-याचे लक्ष वेधले

रमेश धायगुडे
Friday, 25 September 2020

खासदार पाटील यांनी संसदेत लोणंदचे नाव घेत काही प्रश्न उपस्थित केले. लोकांचे प्रश्न लक्षात ठेवून ते कोठे आणि केव्हा मांडायचे, याचे तंत्र असणारे अभ्यासू व कार्यक्षम लोकप्रतिनिधी पाटील यांच्या रूपाने लाभले आहेत असे मत गिरीश रावळ यांनी व्यक्त केेले.

लोणंद (जि. सातारा) : लोणंद रेल्वे जंक्‍शनवर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबाव्यात, शहरात रेल्वेलाइन उड्डाणपूल अथवा अंडरग्राउंड पूल व्हावा. सातारा रेल्वे स्थानकांत मंजूर पोलिस ठाणे लवकर सुरू करा आदी मागण्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी नुकत्याच संसदेत केल्या. त्यामुळे लोणंदकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
 
मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज लोहमार्गावर लोणंद रेल्वे स्टेशन आहे. काही महिन्यांपूर्वी या रेल्वे स्थानकाला रेल्वे जंक्‍शनचा दर्जाही मिळाला आहे. मात्र, या रेल्वे स्थानकात मोजक्‍याच रेल्वे गाड्या थांबतात. लांब पल्ल्याची एकही रेल्वेगाडी थांबत नाही. लोणंद शहर हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. येथे दक्षिणेकडील केरळ, कर्नाटक राज्यांतील अनेक व्यावसायिक स्थायिक आहेत. त्यातून लोणंद शहर हे वाहतुकीच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे कांद्याची राज्यात दोन नंबरची बाजारपेठ आहे. मोठी औद्योगिक वसाहतही आहे. मात्र, रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबत नसल्याने येथील अनेकांना पुणे अथवा मिरज येथे जावे लागते. त्यासाठी लांब पल्ल्याच्या सर्वच रेल्वेगाड्या येथे थांबाव्यात, अशी मागणी येथील प्रवासी संघटना व नागरिक करत आहेत.

मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांनीच केला थातूर मातूरपणा : पृथ्वीराज चव्हाण

रेल्वे लाइनमुळे लोणंद शहर दोन टप्प्यात विभागल्याने रेल्वेलाइन ओलांडताना नागरिक, विद्यार्थी व शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. यासाठी येथे उड्डाणपूल अथवा अंडरग्राउंड पूल व्हावा या मागण्या नागरिक सातत्याने करत आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार पाटील यांच्याकडेही येथील व्यापारी व नागरिकांनी निवेदन देवून या मागण्या केल्या आहेत. 

पाच दिवसानंतर संधी मिळताच श्रीनिवास पाटील मराठा आरक्षणावर गरजले 
 

सातारा शहराजवळ रेल्वे पोलिस स्टेशन मंजूर झाले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. परिणामी रेल्वे प्रवासादरम्यान चोरी झाल्यास, महिलांच्या बाबतीत काही गैर कृत्य किंवा अनुचित घटना घडल्यावर त्यासंदर्भातील तक्रार देण्यासाठी नागरिकांना पुणे किंवा मिरज या ठिकाणी जावे लागत आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या व सोयीच्या दृष्टिकोनातून येथे मंजूर असलेले पोलिस स्टेशन लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली. 

Video : श्रीनिवास पाटलांनी लाेकसभेत माेदी सरकारवर डागली ताेफ
 

लोणंद नगरपंचायतीने रेल्वेगाड्या थांबण्याबाबत ठरावाद्वारे रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे. मात्र, खासदार श्रीनिवास पाटील यांनी थेट संसदेत हा प्रश्न मांडून लोणंदकरांच्या मागणीला न्याय देण्याचे काम केले आहे. 
- सचिन शेळके, नगराध्यक्ष, लोणंद 

खासदार पाटील यांनी संसदेत लोणंदचे नाव घेत काही प्रश्न उपस्थित केले. लोकांचे प्रश्न लक्षात ठेवून ते कोठे आणि केव्हा मांडायचे, याचे तंत्र असणारे अभ्यासू व कार्यक्षम लोकप्रतिनिधी पाटील यांच्या रूपाने लाभले आहेत. 
- गिरीश रावळ, कापडाचे व्यापारी 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Shirnivas Patil Speech On Railway In Loksabha Satara News