esakal | किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना लाभ द्या; खासदार पाटलांची केंद्राकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Prime Minister Kisan Samman Yojana

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सदोष माहिती भरल्याने आणि प्रलंबित डेटा पडताळणीमुळे त्यांना योजनेच्या लाभापासून मुकावे लागले आहे.

किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना लाभ द्या

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत (Prime Minister Kisan Samman Yojana) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सदोष माहिती भरल्याने आणि प्रलंबित डेटा पडताळणीमुळे त्यांना योजनेच्या लाभापासून मुकावे लागले आहे. त्याबाबत सरकारकडून कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा तारांकित प्रश्न उपस्थित करत वंचित शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ द्या, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी लोकसभेत केली. खासदार पाटील यांनी आवाज उठवल्याने कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, चुकांच्या दुरुस्तीसह नोंदणी पडताळणीचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल, अशी ग्वाही दिली. (MP Shrinivas Patil Demand To Provide Benefits To Farmers Under Kisan Samman Yojana bam92)

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. काहींची नोंदणी सदोष झाल्याने त्यांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना योजनेचा मिळालेला नाही. संबंधित शेतकऱ्यांनी त्याची चौकशी केली असता डाटा एन्ट्रीमध्ये गावाची नावे चुकीच्या पद्धतीने भरल्याने गोंधळ झाला आहे, असे लक्षात येताच त्यांनी खासदार पाटील यांच्या निदर्शनास ती गोष्ट आणून दिली होती. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार पाटील यांनी कृषी मंत्रालयाला लेखी प्रश्न विचारला. त्यात किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकरी थेट लाभ हस्तांतरणासाठी अपात्र असल्याच्या तक्रारी आहेत. सदोष किंवा प्रलंबित डेटा पडताळणीत योजनेचा लाभ मिळत नाही. त्याबाबत सरकारकडून कोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, असे विचारले आहे.

हेही वाचा: साताऱ्यात आज-उद्या मुसळधार; हवामान विभागाकडून 'Red Alert' जारी

खासदार पाटील यांच्या मागणीवरून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Narendrasingh Tomar) यांनी उत्तर दिले आहे. या योजनेखाली जिल्ह्यातील पाच लाख ४७ हजार ५१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी पाच लाख २९ हजार ८०० शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. नोंदणी केलेल्यांची पडताळणी पूर्ण झाली, की लाभार्थ्यांना त्याचा लाभ दिला जातो. मात्र, काही शेतकरी वंचित राहिले असल्यास राज्य शासनाकडून जिल्हा व तालुका पातळीवर अधिकारी नियुक्त करून तक्रारींची सोडवणूक केली जात असते. यासंदर्भातील तक्रारी सोडवण्यासाठी किसान पोर्टलचा उपयोग केला जाऊ शकतो. तक्रार निवारणासाठी मदत यंत्रणा समाविष्ट केली गेली आहे. याविषयी हेल्प लाईन नंबर सेवाही आहे. वंचित शेतकऱ्यांच्या नोंदणीतील चुकांची दुरुस्ती व माहितीची पडताळणी लवकर करून या योजनेचा लाभ उर्वरित लाभार्थ्यांना दिला जाईल, असे आश्वासित करण्यात आले आहे.

MP Shrinivas Patil Demand To Provide Benefits To Farmers Under Kisan Samman Yojana bam92

loading image