लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलंच असतं : उदयनराजे गरजले

लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलंच असतं : उदयनराजे गरजले

सातारा : सर्व समाजांबद्दल मला आदर आहे, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत, न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार, हे मी मनापासून सांगतोय असं खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. 

आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची येथील जलमंदिर पॅलेस येथे वृत्तवाहिन्यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी उदयनराजेंनी विविध प्रश्‍नांवर रोखठोक उत्तरे दिली. ते म्हणाले, मी कधीही राजकारण केले नाही. केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजावार अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन, पदावरुन राहून आपण काय करु शकत नसलो तर त्याचा उपयोग काय? वेळ आली तर राजीनामा देईन, असे त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, या मुलाखतीत त्यांनी पोलीस भरतीवर भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचसोबतच सध्या लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलं असतं. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावं इतकचं माझं म्हणणं आहे. लोकांनी निवडून द्यायचं मग त्याच भान ठेवायला हवं, प्रत्येकाला न्याय देण्याची भावना असली पाहिजे. अन्यथा राजेशाही आणा, मग दाखवतो, काय करायचं अन्‌ काय नाही असेही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले. मराठा समाज आज प्रश्न विचारतायेत, आरक्षणावर अन्याय का? उद्या काय करतील मला सांगता येत नाही, राजकीय पक्षांबद्दल संताप व्यक्त होत आहे. आरक्षणावर शरद पवार का गप्प आहेत त्याचे उत्तर तेच देऊ शकतील, मी जे तळमळीनं बोलतोय, मुलभूत प्रश्न समजून घेत नसाल, त्यावर पर्याय काढत नाही, मी सांगकाम्या नाही, कोणीही उठावं आणि सांगावं, कोर्टाचा अवमान करत नाही, पण कोर्ट म्हणजे कोण हो असा सवाल करीत ती माणसचं आहेत त्यांनी विचार करायला हवा आहे, असेही उदयनराजे म्हणाले. 

मी जे बोलतो अंत:करणातून मांडतो, शरद पवार ज्येष्ठ आहेत, मी त्यांचा प्रवक्ता नाही त्यांच्याबद्दल बोलायला. तोडगा काढायची वेळ संपली, परिणामांना सामोरं जावं, लोकांनी जाब विचारला पाहिजे. नेतृत्व कुणाचंही असो, विचार महत्त्वाचा, सर्व देवांची शपथ घेऊन सांगतो आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर अनर्थ होईल. मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे आणि तुमच्यामध्ये काही चर्चा होत आहे का या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले, आमच्यात विसंगती काही नाही. ते जे काय करताहेत ते चांगलेच करीत आहेत. संभाजीराजे आणि मी एकच आहे. त्यांनी करावे माझे दुमत नाही. श्रेयवादात मी पडत नाही. जे करावे लागेल ते मी करणार. मराठा असो धनगर असो किंवा इतर त्यांच्यासाठी मी करणारच. आगामी काळात खूप मोठा उद्रेक होईल असे तुम्हांला वाटते का त्यावर उदयनराजे म्हणाले, येणारी वेळच सांगेल काय होईल ते. केंद्र आणि राज्य सरकार कोण. लोकांच्या जीवावर तुम्ही निवडून येता. त्यांची कामे झाली नाही तर लोक तुम्हांला पायदळी तुडवतील.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव राजेभोसले, पाटील असे काही नाही. त्यांची काय चूक ते ब्राम्हण समाजात जन्माला आले. त्यांनी किती प्रकल्प आणले ते बघा. माणूस त्याच्या कर्तृत्वाने आणि कार्याने मोठा बनतो जातीने नव्हे, असेही उदयनराजेंनी नमूद केले. पदावरुन गेल्यानंतर लोकांना विसर पडतो याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. परंतु आजही लोक वसंतदादा पाटील यांचे नाव घेतात. तुम्ही कामे करा आणि लोकांच्या मनात घर करा. राज्यातील आगामी काळात होणाऱ्या पोलिस भरती विषयावर उदयनराजेंनी मी त्या विषयावर बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. सकल मराठा समाजाला मी उपदेश देण्यासाठी मोठा विचारवंत नाही. कोणाला सांगू, काय बोलू, कसं बोलू असा प्रश्‍न मला पडला आहे. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पाया पडतो. मनात एकच प्रश्‍न येतो कसे करायचे, काय करायचे, वाईट वाटते. सध्या बेड, ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या कामात मी असतो. सारथीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवता येत नसतील तर त्यांना बंदूका अथवा गाडगी द्या, अशी टिप्पणीही उदयनराजेंनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com