..अखेर उदयनराजेंनी न्यायालयाची पायरी चढलीच!

भद्रेश भाटे
Tuesday, 24 November 2020

६ ऑक्टोबर २०१७ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आनेवाडी टोलनाक्याचा ताबा घेण्यावरून खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमचक्री झाली. जमावबंदीचा आदेश लागू असताना धुमश्चक्री झाली होती. त्यामुळे या परिसरातील वातावरण तंग झाले होते. यावेळी टोल नाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वाई (जि. सातारा) : आनेवाडी टोल नाका हस्तांतरण व ताबा घेण्यावरून खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी सुनावणीसाठी
खासदार उदयनराजे भोसले आज वाई न्यायालयात हजर झाले.

आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकाकडे होते. हे व्यवस्थापन आपल्याकडे घेण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशील होते. टोलनाक्याचे व्यवस्थापन हस्तांतरावरुन उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये वाद होता. ६ ऑक्टोबर २०१७ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आनेवाडी टोल नाक्याचा ताबा घेण्यावरून खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमचक्री झाली. जमावबंदीचा आदेश लागू असताना धुमश्चक्री झाली होती. त्यामुळे या परिसरातील वातावरण तंग झाले होते. यावेळी टोल नाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी उदयनराजे व अन्य पंधरा जणांवर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संग्रामसिंहांना सातारा सर्वाधिक मताधिक्‍य देईल : शिवेंद्रसिंहराजे

टोल नाक्यावर झालेला धुमश्चक्रीनंतर सातारा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घरासमोर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला होता. त्यावेळी अज्ञाताकडून गोळीबरही झाला होता. या प्रकरणामध्ये उदयनराजेंचे कार्यकर्ते न्यायालयात हजर झाले होते. मात्र, उदयनराजे हजर झाले नव्हते. उदयनराजेंवर अनेक वेळा साक्षी समन्स बजावण्यात आले होते. याकामी आज दुपारी खासदार उदयनराजे, अशोक सावंत, राजू गोडसे, बाळासाहेब ढेकणे, सनी भोसले, मुरलीधर भोसले, अजिंक्य भोसले, इम्तियाज बागवान, बंडा पैलवान, किरण कुऱ्हाडे आदी प्रमुख संशयितांसह स्वतः हुन वाई न्यायालयात हजर झाले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद एकूण पुढील सुनावणी दि. ७ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. सरकार पक्षाच्यावतीने मिलिंद पांडकर यांनी, तर उदयनराजेंच्या वतीने ताहेर मणेर यांनी काम पाहिले. उदयनराजे न्यायालयात उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Udayanraje Bhosale Appeared In The Court At Wai Today Satara News