पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा

भद्रेश भाटे
Sunday, 25 October 2020

सातारा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्या मानाने वाई शहरात विकासकामे कमी असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक व नगराध्यक्षांनी मतभेद बाजूला ठेऊन आमदार, खासदार कोण आहे याकडे लक्ष न देता शहराच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे.

वाई (जि. सातारा) : चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना झाल्याने मतदारसंघाचे आकारमान मोठे झाल्याने खासदार आणि आमदारांचा निधी हा तोकडा पडत आहे. त्यामुळे महानगरातील लोकप्रतिनिधींचा निधी कमी करून तो इतरत्र वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
 
येथील पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजेंनी बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, मुख्याधिकारी विद्या पोळ, नगरसेविका रूपाली वनारसे, विकास शिंदे, ऍड. दत्ता बनकर आदी उपस्थित होते.

Video : सावधान! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्ता खचला
 
मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये मतदारांच्या हिताचा विचार करण्यात आलेला नाही, तर राजकीय सोयीच्या दृष्टीने पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे मतदारांचे मोठे नुकसान झाले. चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ तयार केल्यामुळे लोकप्रतिनिधींना मिळणारा निधी व मतदारसंघाची मागणी यामध्ये फरक पडत आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि खासदारांना पाच कोटी रुपये आणि विधानसभा मतदारसंघात तीन तालुके येतात व आमदारांना दोन कोटी रुपये विकासकामांसाठी येतात. मात्र, मतदारसंघाची मागणी मोठी असल्यामुळे निधी अपुरा पडत असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. 

साताऱ्याच्या राजघराण्यातील शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, उदयनराजेंचा निर्णय

सातारा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्या मानाने वाई शहरात विकासकामे कमी असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक व नगराध्यक्षांनी मतभेद बाजूला ठेऊन आमदार, खासदार कोण आहे याकडे लक्ष न देता शहराच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. राज्य व केंद्र सरकारकडे जे विषय प्रलंबित आहेत. त्याची यादी करून ते त्वरित माझ्याकडे पोचवा. मी ती कामे मार्गी लावतो, असे त्यांनी सांगितले. या वेळी अजित वनारसे, विजय ढेकाणे, तुषार चक्के, पालिका निरीक्षक नारायण गोसावी, सचिन झेंडे आदी उपस्थित होते. 

...तर पुणे- सातारा रस्ता उखडणार : उदयनराजे 

पुणे- सातारा महामार्ग खराब झाल्याने रस्ते विकास महामंडळाला संबंधित ठेकेदाराचे काम काढून घेण्याबाबत कळविले आहे. रस्ता खराब झाल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. लवकरच रस्ता दुरुस्त झाला नाही, तर स्वतः जेसीपी घेऊन रस्ता उखडून टाकणार आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Udayanraje Bhosale Comment On Pune Banglore National Highway Road Condition Satara News