उदयनराजेंकडून व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल; गुन्‍हा दाखल करण्‍याच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Udayanraje Bhosale

कोणाला शिवीगाळ करणे, अर्वाच्य भाषेत दम देणे, जीवे मारण्‍याची धमकी देणे चुकीचे असल्याचे मत खासदार उदयनराजेंनी व्यक्त केले.

उदयनराजेंकडून व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल

सातारा : भुयारी गटार योजनेच्‍या ठेकेदारास अर्वाच्य भाषा वापरत सातारा पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट (Chief Officer Abhijit Bapat) यांचा एकेरी उल्‍लेख केल्‍याची बांधकाम सभापती सिद्धी पवार यांची एक ऑडिओ क्लीप (Audio clip) आज व्‍हायरल झाली. या क्लीपची गंभीर दखल खासदार उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) घेत विकासकामांत अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात (Government work) अडथळा आणल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनास दिल्‍या आहेत. (MP Udayanraje Bhosale Ordered Municipality To Takes Action Against Those Viral Video Satara Marathi New)

पालिकेने भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतले असून, सध्‍या हे काम मंगळवार पेठेतील विविध भागांत सुरू आहे. कामादरम्‍यान जेसीबीच्‍या धक्क्याने एका इमारतीच्‍या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले होते. हे नुकसान भरून देण्‍याचे त्या वेळी ठेकेदाराने मान्‍य केले होते. यानुसार कामास विलंब होत असल्‍याने बांधकाम सभापती सिद्धी पवार (Speaker Siddhi Pawar) यांनी फोन करत ठेकेदारास त्‍याच्‍या सहकाऱ्यांना दमदाटी करत अर्वाच्य भाषा वापरली होती. याचदरम्‍यान पवार यांनी पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांना उद्देशून एकेरी शब्‍द वापरत शिवीगाळ केली. या शिवीगाळीची ऑडिओ क्लीप आज व्‍हायरल झाल्‍याने सा‍ताऱ्यात खळबळ उडाली. या प्रकरणाची गंभीर दखल खासदार उदयनराजेंनी घेतली.

त्‍यांनी या प्रकरणाची माहिती घेत कामादरम्‍यान झालेले नुकसान भरून देण्‍याचे ठेकेदाराने मान्‍य केले होते. कामादरम्‍यान असे नुकसान होतेच. मात्र, त्‍यामुळे कोणाला शिवीगाळ करणे, अर्वाच्य भाषेत दम देणे, जीवे मारण्‍याची धमकी देणे चुकीचे आहे. नगरसेवक कोणत्‍याही पक्षाचा असुद्यात; पण असे प्रकार चुकीचे आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्‍यास विकासकामे रखडतील. यामुळे मी अभिजित बापट यांना अशा कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्‍हा नोंद करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. याच अनुषंगाने अभिजित बापट यांच्‍याशी संपर्क साधला असता त्‍यांनी फोन उचलला नाही.

गुन्ह्याचा माझ्‍यावर फरक पडत नाही : पवार

सातारकरांच्‍या भावना मी व्‍यक्‍त केल्‍या असून, सुरू असणाऱ्या कामाचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. माझे ते संभाषण एक तारखेचे आहे. ते व्‍हायरल केल्‍याने नागरिकांना माझ्‍या कामाची पद्धत आणि त्‍यांच्‍याविषयी असणारा कळवळा दिसून येतो. क्लीप व्‍हायरल करणाऱ्यांना मी धन्‍यवाद देत असून, लोकहितासाठी कितीही गुन्‍हे दाखल झाले, तरी त्‍याचा मला फरक पडत नसल्‍याची प्रतिक्रिया बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी नोंदवली.

मी जे बोलले ते भावनेच्‍या भरात आणि नागरिकांच्या प्रेमापोटी बोलले आहे. माझी भाषा आक्रमक आहे आणि ती मला मान्‍य आहे. लोक मला कामाबाबत विचारतात, काय काम चाललेय म्हणून. मी हे काम दिवाळीनंतर करा, असे पत्र दिले होते. मात्र, त्‍याला केराची टोपली दाखविण्‍यात आली. नेत्‍यांनी माझ्‍यावर गुन्‍हा दाखल करायला सांगितले आहे. त्‍यांचा प्रत्‍येक शब्‍द मी मानते. माझे बोलणे गुन्‍हा असेल तर काम चार वर्षे रखडवले त्‍यांच्‍यावर का गुन्‍हा दाखल होत नाही, कशाची वाट बघताय, असा सवालही पवार यांनी या वेळी उपस्‍थित केला. मी मूग गिळून गप्‍प बसणार नाही, मी नागरिकांच्या प्रश्‍‍नावर बोलणारच. नागरिकांसाठी गुन्‍हे दाखल करून घेण्‍यास मी तयार आहे. कितीही आरोप झाले आणि गुन्‍हे दाखल झाले, तरी त्‍याचा माझ्‍यावर फरक पडत नसल्‍याचे सांगत कायद्यावर माझा विश्‍‍वास असल्‍याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.

MP Udayanraje Bhosale Ordered Municipality To Takes Action Against Those Viral Video Satara Marathi New