..अखेर पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी उदयनराजेंची भूमिका जाहीर; या पक्षाला मिळणार पाठबळ!

..अखेर पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी उदयनराजेंची भूमिका जाहीर; या पक्षाला मिळणार पाठबळ!

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून या थंडीच्या दिवसात निवडणुकीचे वातावरण अगदी 'गरम' होताना दिसत आहे. निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली असून अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर करत भाजप, आघाडीपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे, तर श्रीमंत कोकाटे हे देखील रिंगणात असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोकाटे यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेत भाजपपुढे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे उदयनराजे नेमकी कोणती भूमिका घेणार याचे औत्सुक्य सर्वांनाच लागून राहिले होते. त्यांनी आपली भूमिकाही गुलदस्त्यातच ठेवली होती. मात्र, आज त्यांनी सोशल माध्यमांव्दारे आपली भूमिका जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीकडून अरुण लाड, पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगांवकर यांना, तर भाजपकडून संग्राम देशमुख, जितेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले आहे की, पुणे विभाग पदवीधर मतदार संघ भाजपा आणि मित्रपक्षाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख, तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र दत्तात्रय पवार हे दोन्हीही कार्यक्षम व उत्साही कार्यकर्ता उमेदवार आहेत. या दोघांची युवक आणि शिक्षकांप्रती असणारी तळमळ आणि त्यांची अभ्यासपूर्ण मुद्ये मांडण्याची सुयोग्य पध्दत हेरुन, यंदाच्या पुणे पदवीधर मतदार संघात, भाजपाने त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. भारतीय जनता पार्टीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, पुणे विभागातील पदवीधर मतदार बंधु-भगिनी आणि शिक्षक मतदार बंधुभगिनींनी संग्राम देशमुख व जितेंद्र पवार यांनाच प्रथम पसंतीचे मत देवून, प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

भाजपा हा भारतात सर्वदूर विस्तारलेला सध्याच्या काळातील एकमेव पक्ष आहे. भाजपा सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून, समाजातील सर्व स्तरातील आणि सर्व घटकांसाठी अहोरात्र झटत आहे. सध्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोघांनी मिळून एखादा अपवाद वगळता, पुणे पदवीधर मतदार संघ भाजपाकडे राखलेला आहे. यंदाच्या वेळी पुणे पदवीधर मधून संग्राम देशमुख यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. पुणे विभागातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार असलेले जितेंद्र पवार यांचे शिक्षण क्षेत्रात अनमोल योगदान आहे. त्यांच्या ज्ञानाचा लाभ सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहका-यांना व्हावा म्हणून भाजपाने त्यांना पुरस्कृत केले आहे.

पुणे पदवीधर मतदार संघातून संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदार संघातील जितेंद्र पवार या दोघांना आम्हीच उमेदवार आहोत असे समजून, पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी आपल्या पहिल्या पसंतीचे मत द्यावे, असे आवाहनही उदयनराजे भोसले यांनी केले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून गुलदस्त्यात असलेली भूमिका जाहीर करत उदयनराजेंनी भाजपला साथ दिली आहे. कोकाटे यांच्या भेटीने उदयनराजे वेगळी भूमिका घेतील अशी शक्यता असतानाच आज त्यांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देत आपली भूमिका जाहीर केली आहे, त्यामुळे या निवडणुकीत आता मोठी चुरस पहायला मिळणार आहे. उदयनराजेंच्या या पाठिंब्यामुळे भाजपला मोठे पाठबळ मिळाले असून साता-यातून चांगले मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी देखील प्रचारात आघाडी घेत भाजपचे उमेदवार निवडून आणायचेच असा चंग बांधला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला समजल्या जाणा-या साता-यात महाविकास आघाडी कितपत मताधिक्य घेणार हे निवडीवेळीच स्पष्ट होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com