वॉर्ड रचनेनूसार पालिकांच्या निवडणुकांसाठी लगीनघाई सुरु

सचिन शिंदे
Wednesday, 30 December 2020

वॉर्ड रचना सुरू होणार असल्याने मोठ्या प्रमाणात पालिकांचे राजकारण गतीत येण्याची चिन्हे आहेत. पालिकेतील स्थानिक नेते त्यांच्या सोयीप्रमाणे वॉर्ड रचना करून घेण्यासाठी सक्रिय होतील. त्यामुळे येत्या काही दिवसांत पालिकांच्या शह-काटशहाच्या राजकारणाला गती येणार आहे. 

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील पालिकांचा निवडणुका यंदा सिंगल वॉर्डनिहाय होणार आहेत. राज्य शासनाने प्रत्येक पालिकेला सिंगल वॉर्ड रचना करण्याचे काम त्वरित हाती घ्यावेत, असा आदेश धाडला आहे. त्यानुसार कऱ्हाड, साताऱ्यासह जिल्ह्यातील अन्य पलिकांच्या क्षेत्रात सिंगल वॉर्ड रचनेचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. वॉर्ड रचनेचे आदेश प्राप्त झाल्याने पालिका प्रशासनही या कामात व्यस्त आहे. येत्या काही दिवसांतच मुख्याधिकाऱ्यांना वॉर्ड रचना जाहीर करावी लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील पालिकांमध्ये निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.
 
पालिकांच्या निवडणुका सिंगल वॉर्ड पद्धतीने होणार आहेत, असे राज्य शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार त्याचा आदेशही काढण्यात आला आहे. प्रत्यक्षात वॉर्ड रचनेचे काम सुरू करण्याचे आदेश प्रत्येक पालिकेला नुकतेच शासनाने दिले. त्यानुसार प्रत्येक पालिकेत आता वॉर्ड रचनेची लगबग लवकरच सुरू होणार आहे. वॉर्ड रचनेच्या कामात पालिकांना विशेष लक्ष घालावे लागणार आहे. मागील निवडणुका दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पालिकेला आता सिंगल प्रभागांची रचना करावी लागणार आहे. त्यासाठी शासनाने काही सूचनाही दिल्या आहेत. वॉर्ड रचना करताना काही टप्पेही सुचविले आहेत. वॉर्ड रचना, मागील निवडणुकांतील वॉर्डांची आरक्षणे, अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमातीच्या आरक्षणाचा वॉर्ड रचना, नागरिकांच्या मागास प्रवर्गास महिला आरक्षणाची सोडत काढणे, प्रारूप वॉर्ड रचना जाहीर करणे, त्यावर हरकती व सूचनांची सुनावणी घेणे, त्यानंतर अंतिम वॉर्ड रचना जाहीर करणे व ती वॉर्ड रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रत्येक पालिकेत वॉर्ड रचनेच्या फेऱ्या सुरू होतील.

ED कारवाईत सुसाट, मात्र गुन्हे सिद्ध करण्यात नापास; पाहा रिपोर्टकार्ड
 
वॉर्ड रचना करताना 2011 ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार आहे. त्या जणगणनेनुसार लोकसंख्या, अनुसूचीत जातीची व अनुसूचीत जमातीची लोकसंख्या व प्रगणक गटाचे नकाशे उपलब्ध करून रचना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वॉर्डाची रचना करताना त्याची दिशा, तेथील सरासरी लोकसंख्येनुसार प्रभागांची संख्या ठरविण्याचेही आदेशात नमूद केले आहे. अंतिम वॉर्ड रचना मंजूर करून प्रसिद्धीस देण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. वॉर्ड रचना ही मुख्याधिकारी करतील, प्रारूप मान्यतेसह त्याच्या हरकती, त्यात बदल व सूचनांनतर अंतिम वॉर्ड रचनेला मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे वॉर्ड रचनेचे काम अधिक गतीने होणार आहे. वॉर्ड रचना सुरू होणार असल्याने मोठ्या प्रमाणात पालिकांचे राजकारण गतीत येण्याची चिन्हे आहेत. पालिकेतील स्थानिक नेते त्यांच्या सोयीप्रमाणे वॉर्ड रचना करून घेण्यासाठी सक्रिय होतील. त्यामुळे येत्या काही दिवसांत पालिकांच्या शह-काटशहाच्या राजकारणाला गती येणार आहे.

नव्या वर्षातील पहिले दाेन दिवस साता-यातील मिलिटरी कॅंटीन राहणार बंद 

 

  •  वॉर्डातील वस्त्यांचे विभाजन होणार नाही. 
  •  अनुसूचीत जाती व जमातीच्या वस्त्यांचे विभाजन न करता वॉर्ड रचना. 
  •  वॉर्डातील नागरिकांचे दळणवळणही वॉर्ड रचना करताना विचारात घेणार. 
  •  वॉर्ड रचना करताना प्रगणक गट फोडणार नाहीत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muncipal Council Election Will Hold As Per Ward Satara News