आपल्यातलाच मुलगा आभाळाएवढा मोठा झाल्याने माथाडी कामगार भारावून गेले

संजय जगताप
Saturday, 14 November 2020

वडिलांच्या सोबत काम करणारे अनेक माथाडी कामगार होते. आजही काही जण तेच काम करीत आहेत. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा, समाजातील त्या वंचित घटकांचीही दिवाळी गोड व्हावी, या उदात्त हेतूने डॉ. थोरात यांनी दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे संयोजन केले.

मायणी (जि. सातारा) : माथाडी कामगारांचे जीवन प्रकाशमय व्हावे, या उदात्त हेतूने त्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि व्यसनमुक्तीचे धडे देत फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. युरोपमधील संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांच्या माध्यमातून राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
विश्वविख्यात ऑक्‍सफर्ड विद्यापीठात मुले व महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरवर संशोधन करणारे वरिष्ठ संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांनी त्यांचे वडील देवाप्पा थोरात यांचे अकाली निधन झाले. वडिलांच्या सोबत काम करणारे अनेक माथाडी कामगार होते. आजही काही जण तेच काम करीत आहेत. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा, त्यांना शिक्षणाचे महत्त्व उमगावे, त्यांचे योग्य प्रबोधन व समुपदेशन व्हावे, समाजातील त्या वंचित घटकांचीही दिवाळी गोड व्हावी, या उदात्त हेतूने डॉ. थोरात यांनी दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे संयोजन केले. त्यांच्या मातोश्री श्रीमती सीमा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी उपसरपंच दादासाहेब कचरे, ग्रामपंचायत सदस्या अर्चना जाधव, फ्रेंड्‌स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव, प्रकाश सुरमुख, मुख्याध्यापक पोपट मिंड, मुख्याध्यापक संजय जगताप, सचिन राजमाने आदी उपस्थित होते.

फराळ वितरणापूर्वी सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. त्या वेळी सुरमुख म्हणाले, ""व्यसनापासून दूर राहा. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. आपल्या मुलांपुढे डॉ. थोरात यांचा आदर्श ठेवा.'' कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. स्वतःला कमी समजू नका, तुमच्या शैक्षणिक इच्छा, आकांक्षा मुलांच्या माध्यमातून पूर्ण करा, असे सांगितले. संजय जगताप यांनी डॉ. थोरात यांच्या संशोधन विषयक कार्याची माहिती देऊन त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

खासदार पाटलांचा रांगडा अंदाज, चक्क शेतात उतरुन केली भातकापणी

कचरे यांनी लवकरच डॉ. थोरात यांचा मायणीकरांच्या वतीने नागरी सत्कार घेण्याचे जाहीर केले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते सर्व उपस्थित माथाडी कामगारांना दिवाळी फराळाचे वितरण करण्यात आले. आपल्याच एका कामगाराचा मुलगा आभाळाएवढा मोठा झाल्याचे ऐकून सर्व जण भारावून गेले. महेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कोळी यांनी आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanasaheb Thorat Distributed Sweets To Mathadi Workers Satara News