ढोरोशी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढोरोशी ग्रामपंचायत

ढोरोशी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार

तारळे - केंद्र सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात ‘दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२२’ हा ग्रामपंचायत विभागातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार ढोरोशी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. त्यामुळे ढोरोशीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गाव करील ते राव काय करील, अशी ग्रामीण म्हण प्रचलित आहे. त्यानुसार ग्रामस्थांची एकजूट, चांगल्या कार्यासाठी धडपडणारे ग्रामपंचायत पदाधिकारी, त्यांना साथ करणारे नागरिक या त्रिसूत्रीच्या जोरावर ढोरोशी (ता. पाटण) ग्रामपंचायतीने देशपातळीवरील पुरस्कारावर नाव कोरले. विकासकामे दर्जेदार व पारदर्शी करण्याची हातोटी ग्रामपंचायतीने संपादली आहे. सुमारे दोन हजार लोकसंख्या असणाऱ्या गावातील विविध विकासकामे त्याची साक्ष देत आहेत. गावचा कणा असलेली नूतन ग्रामपंचायत इमारत शहरातील कार्पोरेट ऑफिसलाही मागे टाकेल इतकी सुंदर व दर्जेदार बांधली आहे. दूरदूरवरून ती पाहण्यासाठी लोक येत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन चालणारे पदाधिकारी व तितक्याच तन्मयतेने साथ करणारे गावकरी हीच ढोरोशीच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यातून त्यांनी लोकसहभागातून विविध कामे मार्गी लावली आहेत.

असाच जोर त्यांनी दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी लावला होता. सारे गाव त्यासाठी झटत होते. जानेवारीमध्ये त्याची तपासणी झाली होती. रात्र होऊनही गावकरी उत्साहाने सर्व सादरीकरण करीत होते. पुरस्कारासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण केले होते. काल (ता. १०) पुरस्कार जाहीर होताच गावात एकच आनंद पसरला. आपल्या सचोटी व प्रामाणिक कामाने त्यांनी देशपातळीवरील पुरस्काराला गवसणी घातली. महाराष्ट्रातील २७ हजार ग्रामपंचायतींतून फक्त १७ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून एकमेव ढोरोशी ग्रामपंचायतीचा त्यात समावेश आहे. २४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

हा पुरस्कार मिळविण्यासाठी गटविकास अधिकारी मीना साळुंखे, विस्तार अधिकारी जयवंत वाघ, ग्रामस्थ व ग्रामसेवक, ग्रामस्तरावरील सर्व घटकांचे योगदान लाभले. नोकरी, व्यवसायानिमित्त गावाबाहेर असणारे व भारतीय सैन्यदलातील नागरिकांचेही सहकार्य लाभल्यामुळे हे यश मिळाले.

- नलिनी मगर, सरपंच, ढोरोशी

Web Title: National Award Dhoroshi Gram Panchayat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top