तयारी घटस्थापनेची : मातीचे घट, वावरीसह खाऊच्या पानांसाठी साता-यात गर्दी

दिलीपकुमार चिंचकर
Friday, 16 October 2020

उत्सवात फळांचे दर हमखास वाढतात. सध्या केळी 30 ते 50 रुपये डझन, तर सफरचंद प्रतीप्रमाणे 120 ते 200 रुपये किलो दराने विकली जात आहेत. खजूर 80 ते 300 रुपये किलो आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे.

सातारा : कोरोनाचे सावट आणि उत्सव साजरे करण्यावर काहीशी बंधने असली तरीही आदिमाया आदिशक्ती देवी भगवतीचा उत्सव नागरिक तेवढ्याच उत्साहात पण साधेपणाने साजरा करणार आहेत. शनिवारी (ता. 17) घटस्थापनेने या नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. दरम्यान, घटस्थापनेसाठी लागणारे मातीचे घट, धान्य, वावरीसह खाऊची पानेही खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढली आहे. 

नवरात्रोत्सव हा महिलांसह युवक-युवतींचा जिव्हाळ्याचा सण. मात्र, या वर्षी कोरोना विषाणूच्या सावटामुळे हा सणही नागरिकांना साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. या उत्सवास घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. शनिवारी घटस्थापना असून, त्यासाठी लागणारे मातीचे घट राजवाडा परिसरात तसेच पोवई नाका परिसरात कुंभार कलाकारांनी विक्रीसाठी मांडले आहेत. त्याचे दर साधारण दहा ते 15 रुपयांपर्यंत आहेत. घटासाठी लागणारी वावरी (शेतातील माती) तसेच खाऊची पाने आणि धान्यही विक्रीसाठी आले असून, त्यांच्या खरेदीसाठी वर्दळ वाढली आहे. यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे सर्वच सण साधेपणाने साजरे करावे लागले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या प्रसाराला आळा बसू लागला आहे. मात्र, पूर्ण थांबलेला नाही. त्यामुळे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.

अजित पवारांच्या भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजेंचे सीमोल्लंघन?

दरम्यान, महिला, मुलींसह अनेक नागरिक या नवरात्रात उपवास करतात. काहीजण एकवेळ भोजन करतात तर अनेक महिला नऊ दिवस केवळ फलाहार घेतात. यामुळे या उत्सवात फळांचे दर हमखास वाढतात. सध्या केळी 30 ते 50 रुपये डझन, तर सफरचंद प्रतीप्रमाणे 120 ते 200 रुपये किलो दराने विकली जात आहेत. खजूर 80 ते 300 रुपये किलो आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे.

नवरात्रोत्सवात गरबा, दांडियाला बंदी : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival Begins From Tomorrow Satara News