esakal | आणखी बोलून चंद्रकांत पाटील यांना त्रास नाही देणार; जयंत पाटलांची काेपरखळी
sakal

बोलून बातमी शोधा

आणखी बोलून चंद्रकांत पाटील यांना त्रास नाही देणार; जयंत पाटलांची काेपरखळी

महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे स्वच्छ प्रतिमेचे आहेत. त्यांच्यावर कोणाचेही पाच पैसे बुडविल्याचा आरोप नाही. त्यामुळे या निवडणुकीत तेच बाजी मारतील, असा विश्‍वासही श्री. पाटील यांनी व्यक्‍त केला.

आणखी बोलून चंद्रकांत पाटील यांना त्रास नाही देणार; जयंत पाटलांची काेपरखळी

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : राज्याचा कारभार महाविकास आघाडीच्या माध्यमातून अतिशय उत्तम आणि पारदर्शक सुरू आहे. महाविकास आघाडीचे घटक असणाऱ्या सर्व पक्षांमध्ये समन्वय असल्यानेच विरोधक चिंतेत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केली. चंद्रकांत पाटील यांना अगोदरच सर्व जण बोलत आहेत. त्या सगळ्यांच्या बोलण्याचा त्यांना फार त्रास होत असल्याने आणखी बोलून त्यांना मी त्रास देणार नाही, अशी कोपरखळीही त्यांनी या वेळी मारली.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी श्री. पाटील येथील राष्ट्रवादी भवनात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील यांनी आमचे पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वास व्यक्‍त केला. अलीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मवाळ भूमिका घेतल्याबाबत विचारले असता, जयंत पाटील म्हणाले, ""महाविकास आघाडीचा कारभार अत्यंत समन्वय ठेऊन सुरू आहे. राज्यात सत्तेत आल्यानंतर महापूर, अवकाळी पाऊस, वादळ आणि कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीचा सामना सरकारला करावा लागला.

लॉकडाउनमुळे सरकारी तिजोरीवर ताण आला असतानाही अडचणीत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने सुमारे दहा हजार कोटींची मदत दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प अतिक्षय चांगला आहे. मात्र, कोरोनामुळे सर्व बाजूचे उत्पन्न थंडावले. अशा परिस्थिीतही राज्याने कोरोनाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने मुकाबला केला. चांगले काम करत असतानाही विरोधकांनी जाणीवपूर्वक सरकारवर टीका केली. या टीकेकडे दुर्लक्ष करत त्याने न विचलित होता महाविकास आघाडीचे काम अत्यंत दमदारपणे सुरू आहे.'' महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे स्वच्छ प्रतिमेचे आहेत. त्यांच्यावर कोणाचेही पाच पैसे बुडविल्याचा आरोप नाही. त्यामुळे या निवडणुकीत तेच बाजी मारतील, असा विश्‍वासही श्री. पाटील यांनी व्यक्‍त केला.

सावधान! साता-यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने गंडा घालणारी टोळी सक्रिय 

राष्ट्रपती राजवटीचा नाही प्रश्‍न
 
सरकार बहुमतात आहे आणि ते लोकशाहीचे सर्व संकेत पाळून कार्यरत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा प्रश्‍नच नसल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पाटील यांनी टीका केली. सरकार अडचणीत आहे, ते पडेल अशी हाकाटी काही जण मारत आहेत. मात्र, त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्‍त केले.

Edited By : Siddharth Latkar