esakal | राष्ट्रवादीत "कही खुशी, कही गम...' 
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सातारा-जावळी, कोरेगाव आणि पाटण हे तीन मतदारसंघ गमवावे लागले आहेत.या ढासळलेल्या बुरुजांची पुन्हा नव्याने बांधणी होण्यासाठी आतापासूनच मळणी करावी लागणार आहे.

राष्ट्रवादीत "कही खुशी, कही गम...' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : गेल्या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात सर्व सत्तास्थाने मिळवत पक्षाचा बालेकिल्ला निर्माण केला; पण विधानसभा निवडणुकीत बालेकिल्ल्यातच पक्षाला तीन आमदार गमवावे लागले. कार्यकर्त्यांची फळी विस्कळित झाली आहे. अशा स्थितीत राज्याच्या सत्तेत सहभागी असूनही वर्धापन दिन साजरा करताना पक्षात आजही "कही खुशी कही गम' अशीच अवस्था आहे.

साताऱ्याच्या जनतेने 1999 पासून खासदार शरद पवार यांची पाठराखण केली. आता आगामी काळात होणाऱ्या जिल्हा बॅंक, कारखाने व इतर निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी लागणार आहे.

सातारा जिल्हा मूळचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला; पण 1999 मध्ये शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. त्या वेळी जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी श्री. पवार यांच्यासोबत गेली. त्या वेळपासून जिल्ह्याने श्री. पवार यांना साथ दिली. आज तब्बल 20 वर्षे झाले तरी सातारकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व श्री. पवार यांची साथ सोडलेली नाही.

मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला तीन मतदारसंघ गमवावे लागले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपने केला. त्यासाठी केंद्र व राज्यातील सर्व नेत्यांची ताकद वापरली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ खासदार होऊन चार महिने झालेले उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यामुळे साताऱ्याचे दोन्ही राजे भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीला धक्‍का बसला; पण उदयनराजेंना राष्ट्रवादीने पुन्हा खासदार होऊ दिले नाही. खासदार शरद पवार यांनी भर पावसात सभा घेऊन साताऱ्याच्या जनतेला मी मागील वेळी केलेली चूक या निवडणुकीत तुम्ही दुरुस्त करा, असे आवाहन केले. सातारकरांनी खरोखरच ती चूक दुरुस्त केली आणि श्रीनिवास पाटील निवडून आले. 

आज महाविकास आघाडीच्या सत्तेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सहभागी असताना जिल्ह्याला सहकार व पणन मंत्रिपद दिले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांना पुन्हा ताकद दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सातारा-जावळी, कोरेगाव आणि पाटण हे तीन मतदारसंघ गमवावे लागले आहेत.या ढासळलेल्या बुरुजांची पुन्हा नव्याने बांधणी होण्यासाठी आतापासूनच मळणी करावी लागणार आहे. त्यासाठी सर्व आमदारांसह पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन पक्षातील कार्यकर्त्यांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी लागणार आहे. 


निवडणुकीत दणका बसण्याची भीती 

राज्यातील सत्तेत असूनही जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे नेत्यांचे दुर्लक्ष झाले आहे. या सर्वांना सत्तेच्या माध्यमातून ताकद देण्याचे काम करावे लागणार आहे, तरच आगामी जिल्हा बॅंक, साखर कारखाने, तसेच इतर निवडणुकांत राष्ट्रवादीची ताकद अबाधित राहणार आहे. अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीसारखा जिल्हा बॅंक, साखर कारखाने व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दणका बसण्याची भीती आहे.