भाजपचे हिंदुत्व ढोंगीपणाचे; विद्याताई चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp Vidya Chavan statementg BJP Hindutva hypocrisy politics satara

भाजपचे हिंदुत्व ढोंगीपणाचे; विद्याताई चव्हाण

सातारा : लोकांत भांडणे लावून सत्तेची मलई खायचे काम भाजप करत आहे. त्यांचे हिंदुत्व ढोंगी असून, संत परंपरेला नख लावण्याचे काम भाजप करत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आरएसएसचे योगदान नव्हते. ते इंग्रजांना साथ देत होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी केला. दरम्यान, भाजपने मताला एक लाख रुपये दिले, तरी बारामती राष्ट्रवादीमुक्त होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी महिला पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती घेण्यासाठी विद्याताई चव्हाण साताऱ्यात आल्या होत्या. या वेळी राष्ट्रवादी भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रा. कविता म्हेत्रे, राजकुमार पाटील उपस्थित होते.

चव्हाण म्हणाल्या, ‘‘महिला जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करायची आहे. समाजकारण करणाऱ्या अनेक महिला राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. त्यांच्यातून सक्षम व पक्षासाठी वेळ देणाऱ्या महिलेलाच या पदावर संधी दिली जाईल. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह सर्वच निवडणुकीत भाजप पैशांचे वाटप करीत आहे. संभाव्य मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पैसे वाटण्याची तयारी भाजपने केली आहे.’’ भाजपच्या अमेठी, बारामती मिशनविषयी त्या म्हणाल्या, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे तेथे मोठे योगदान आहे. तेथे पंतप्रधान मोदी निवडणुकीला उभे राहिले, तरी काही फरक पडणार नाही. त्यांनी मताला एक लाख रुपये दिले, तरी बारामती राष्ट्रवादीमुक्त होऊ शकत नाही.’’
देशात महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे असून, त्या विरोधात महिला राष्ट्रवादीतर्फे लवकरच राज्यभर जिल्हास्तरीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असणाऱ्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भाजपचे ढोंगी हिंदुत्व समाजावर बिंबवण्याचे काम करत महागाई व बेरोजगारी मुद्द्यावरून नागरिकांचे लक्ष हटविण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

मतदार विकणार नाही, भूमिका ठेवा

आमदार शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताला तीन हजारांचा भाव काढला होता. हा धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे पारदर्शक कारभारासाठी राज्यातील मतदारानेच मतदार विकणार नाही, ही भूमिका ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा विद्याताई चव्हाण यांनी व्यक्त केली.

Web Title: Ncp Vidya Chavan Statementg Bjp Hindutva Hypocrisy Politics Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..