
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत खटाव तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने गट, गण व गाव निहाय मायक्रो प्लॅनिंग करण्याचा निर्धार करण्यात आला.
वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे मायक्रो प्लॅनिंग
वडूज - आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत खटाव तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने गट, गण व गाव निहाय मायक्रो प्लॅनिंग करण्याचा निर्धार करण्यात आला.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत निवडणूकीसंदर्भात चर्चा विनीमय करण्यासाठी सातेवाडी (ता.खटाव) येथील मधुमाला सांस्कृतिक कार्यालयात तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी मान्यवरांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी हा निर्धार केला. निवृत्त आयुक्त व खटाव माण राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रा. अर्जुनराव खाडे, प्रा. बंडा गोडसे, आशाताई बरकडे, बाळासाहेब माने, हणमंतराव शिंदे, प्रा.एस.पी. देशमुख, पृथ्वीराज गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांच्या फेररचनेत तालुक्यात मोठे बदल झाले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी संधी द्यावी. उमेदवारी देताना लहान गावांतील कार्यकर्त्यांचाही विचार करावा, अशी मते यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली.
यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, ग्रामपंचायत, सोसायटी निवडणूकीत झालेले मतभेद कार्यकर्त्यांनी दूर ठेवावेत. पक्ष हाच आपला विचार मानून तळागाळातील लोकापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवावीत. गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात पक्ष व पदाधिकाऱ्यांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवावे. सामान्य माणसाचे हित लक्षात घेऊन सामाजिक प्रश्नांकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे. २००९ सालानंतर तालुक्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. दहशत व पैश्यांचा वापर करून घरा घरांत व समाजांत फूट पाडली जात आहे. ही परिस्थिती थांबविण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसंदर्भात गट, गण निहाय गावोगावी बैठका घेऊन तरूण तसेच ज्येष्ठांची मते जाणून घेतली जातील. त्यातून सर्वानुमते इच्छुक उमेदवारांना संधी दिली जाईल. तालुक्यावर असलेले राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे.
तालुकाध्यक्ष मोरे म्हणाले, खटाव तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्था तसेच जिल्हा परिषद गट, पंचायत समितीवर राष्ट्रवादीची असणारी सत्ता अबाधित ठेवण्यासाठी विचार विनीमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रा. खाडे, प्रा. गोडसे, प्रा. देशमुख, श्री. माने, श्री. शिंदे आदींची भाषणे झाली.
बैठकीस विजय खाडे, प्रा. राम साळुंखे, डॉ. संतोष देशमुख,डॉ. महेश माने, ज्ञानेश्वर शिंदे, सदाशिव बागल, योगेश जाधव, सौ. प्रमिला पाटोळे, राजेंद्र फडतरे, डॉ. प्रकाश पाटोळे, अक्षय फडतरे, ॲड. रोहन जाधव, प्रताप देशमुख, खुदबुद्दीन शिकलगार, सुनिल नेटके, सोमनाथ साठे, डॉ. आकाराम बोडके, शशिकांत देशमुख, निसार मुल्ला, नवनाथ देशमुख, संभाजी पवार,पोपट पाटील, तानाजी बागल आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडी कडून करण्यात आलेल्या कारवाईचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. राहूल पवार यांनी आभार मानले.
Web Title: Ncps Micro Planning To Maintain Supremacy Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..