Covid 19 : आजही पाचगणीकरांचे लाखो रुपये खर्च हाेताहेत

रविकांत बेलोशे
Thursday, 22 October 2020

पाचगणीमधील हे कोविड सेंटर अंतिम टप्प्यात आले असून काही दिवसांतच ते सुरू होईल. समाजातील काही दानशूर लोकांनी पुढे आल्यास हे केंद्र आणखी गतीने आकारास येईल व रुग्णांना सुकरपणे उपचार घेता येतील असे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी नमूद केले.

भिलार (जि. सातारा) : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर लवकरच कार्यान्वित होणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली खरी; पण आता महिना उलटूनही या सेंटरला मुहूर्त मिळालेला नाही. या कोविड सेंटरचे नेमके घोडे कशात अडलंय, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. सेंटरअभावी कोरोनाबाधितांना लाखो रुपये खर्च करून उपचार घ्यावा लागत आहे.
 
पाचगणी येथे प्रशासनाच्या वतीने 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्यासाठी धावाधाव झाली. जागेचा प्रश्न मिटला. प्रशासनाने डॉन ऍकॅडमीची इमारत ताब्यात घेतली. पाहणी झाली, कामाला सुरवातही झाली, पण अजूनही या सेंटरचा प्रारंभ झाला नाही. 
महाबळेश्वरमधील कोरोना केअर सेंटर प्रशासनाने बंद केले आहे, तर पाचगणी येथील बेल एअर येथील कोविड सेंटरमध्ये शुल्क आकारणी सुरू केल्याने तोही पर्याय सर्वसामान्यांना बंद झाला आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते त्या ठिकाणी उपचार घेऊ शकतात. परंतु; सर्वसामान्यांच्या उपचाराची मात्र अजूनही परवडच सुरू आहे. 
वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हॉस्पिटल अपुरी पडू लागल्याने आमदार मकरंद पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला असल्याचे समजते.

कोरोनापश्‍चात लक्षणांकडे दुर्लक्ष नको : डॉ. सुभाष चव्हाण

या सेंटरसाठी आमदारांकडून ऑक्‍सिजन बेड व रुग्णवाहिका उलब्ध करून दिली जाणार आहे, अशा घोषणा झाल्या. पण, त्या प्रत्यक्षात केव्हा उतरणार, असा प्रश्न आहे. या कोविड केअर सेंटरवर 100 बेड तसेच 50 ऑक्‍सिजन बेड असतील, असे प्रशासनाने सांगितले आहे. पण, कोरोना रुग्णांना नुसता दिलासा नको तर ते तातडीने सुरू करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

पाचगणीमधील हे कोविड सेंटर अंतिम टप्प्यात आले असून काही दिवसांतच ते सुरू होईल. समाजातील काही दानशूर लोकांनी पुढे आल्यास हे केंद्र आणखी गतीने आकारास येईल व रुग्णांना सुकरपणे उपचार घेता येतील. 

- गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, पाचगणी 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Necessity Of Covid Center In Panchgani Says Citizens Satara News