esakal | नवीन 'सीएस'ना 'सिव्हिल'ची घडी बसविण्याचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

satara

कोरोनाबाधितांचा वाढता मृत्यूदर रोखण्याबरोबर अन्य आजारांच्या रुग्णांनाही तेवढ्याच चांगल्या पद्धतीची सेवा उपलब्ध करून देण्याचे काम नवीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना करावे लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व चतुर्थश्रेणी यांच्यातील समन्वयाची बिघडलेली घडी बसविण्याबरोबर डॉ. अमोद गडीकर यांच्या कार्यकाळात ढासळलेली जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा सुधारण्याचे आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे. 

नवीन 'सीएस'ना 'सिव्हिल'ची घडी बसविण्याचे आव्हान

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : कोरोनाबाधितांचा वाढता मृत्यूदर रोखण्याबरोबर अन्य आजारांच्या रुग्णांनाही तेवढ्याच चांगल्या पद्धतीची सेवा उपलब्ध करून देण्याचे काम नवीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना करावे लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व चतुर्थश्रेणी यांच्यातील समन्वयाची बिघडलेली घडी बसविण्याबरोबर डॉ. अमोद गडीकर यांच्या कार्यकाळात ढासळलेली जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा सुधारण्याचे आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचे वाभाडे निघाल्यानंतर आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच डॉ. गडीकरांच्या जिल्ह्यातील वादगस्त कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला. त्यांची बदली होईल अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. एका कारकिर्दीत दोनदा सक्तीच्या रजेवर जावे लागणारे डॉ. गडीकर हे जिल्ह्यातील बहुदा पहिलेच शल्यचिकित्सक ठरले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा कधी नव्हे एवढी डागाळली गेली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयामधील सर्व स्टाफची एकत्रित मोट बांधण्यात त्यांना अपयश आले होते.

वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी अशा कोणत्याच पातळीवर त्यांना समन्वय राखता आला नाही. डॉ. डी.डी.मारूलकरांनंतर तो समन्वय राखण्याची हातोटी डॉ. सुरेश जगदाळे यांनी दाखविली होती. त्यामुळे या दोघांच्या कार्यकाळात जिल्ह्यामध्ये नवीन यंत्रणा कार्यन्वित झाल्या. परंतु, त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या एकंदर कार्यपद्धतीचा दर्जा ढासळत गेला. त्याचा साहजिकच रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांवर परिणाम झाला आहे.
 
डॉ. जगदाळे यांच्यानंतर डॉ. श्रीकांत भोई यांनी तीन वर्षे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यपद्धतीचा रुग्णालयातील स्टाफला काही त्रास झाला नाही. परंतु, लोकांना मिळणाऱ्या सुविधांचा बोजवारा उडाला होता. त्यानंतर डॉ. गडीकरांनी पदभार स्वीकारला. सुरवातीच्या काही दिवसांत त्यांनी रुग्णालयाच्या एकंदर कारभाराला शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा कारभार केवळ 'नव्याची नवलाई' दाखवणारा ठरला. त्यानंतर एका कोषातच त्यांचा कारभार सुरू होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी व अन्य कर्मचारी कोणामध्ये योग्य समन्वय साधणे त्यांना शक्‍य झाले नाही.

सर्वांना समन्यायी पद्धतीने वागविण्यात त्रुटी राहिल्यामुळे सर्वच घटकांमध्ये असंतोष खदखदत होता. त्यामुळेच रुग्णालयातील लाचखोरीच्या प्रकरणानंतर ते रजेवर गेल्यावर फटाक्‍यांची आतषबाजी झाली आणि काही महिन्यांनी ते पुन्हा कामावर हजर झाले तेव्हा हे नकोतच, असा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला होता. असा प्रकार रुग्णालयात यापूर्वी कधीही घडलेला नव्हता. 

त्यानंतरही डॉ. गडीकरांच्या कार्यपद्धतीत बदल झाला नव्हता. परिणामी रुग्णालयाचा कारभार नेहमीच चव्हाट्यावर येत राहिला. अगदी कोरोना संसर्गाच्या काळातही चुकीच्या कार्यपद्धतीमुळे तो सातत्याने उफाळून येत गेला. त्यातून रुग्णालयाच्या प्रतिमेला तडा गेला आहे.

वास्तविक जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्यसेवेचे आशास्थान आहे. आर्थिक परिस्थिती नसलेल्या अनेकांना या रुग्णालयाने विविध आजारांमध्ये जीवदान दिले आहे. त्या योग्यतेचा सर्व स्टाफही या ठिकाणी आहे. त्यासाठी गरज आहे ती त्या सर्वांतील चांगले बाहेर काढण्याची पात्रता असलेल्या कर्णधाराची. ते काम डॉ. सुभाष चव्हाण यांना प्रामुख्याने करावे लागणार आहे. 

'ओपीडी'कडे दुर्लक्ष नको...  

कोरोना संसर्गाकडे सर्वांचे लक्ष असल्यामुळे अन्य आजारांच्या दैनंदिन 'ओपीडी'कडे दुर्लक्ष झालेले आहे. शस्त्रक्रियांचे नियोजन पुरते कोलमडले आहे. आयुष्य विभागात औषधांची कमतरता आहे. कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान पेलताना या गोष्टी सुधारण्याकडेही डॉ. चव्हाण यांना लक्ष द्यावे लागणार आहे. तरच, सर्वसामान्य नागरिकाला चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध होईल.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top