दिवाळी गोड! 'न्यू फलटण' देणार शेतकऱ्यांना पैसे; सभापती रामराजेंची ग्वाही

किरण बोळे
Thursday, 29 October 2020

न्यू फलटण शुगर वर्क्‍स लि., या कारखान्याला सन 2017-2018 च्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना एनसीएलटीच्या निर्णयानुसार 25 कोटी 49 लाख रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पेमेंट करण्याची कायदेशीर जबाबदारी नसली तरी आपल्या सूचनेनुसार उर्वरित 2200 शेतकऱ्यांना प्रतिटन एक हजार रुपयांप्रमाणे सुमारे नऊ कोटी रुपयांचे पेमेंट ता. एक नोव्हेंबर दरम्यान करण्याची ग्वाही सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

फलटण (जि. सातारा) : साखरवाडी येथील तत्कालीन न्यू फलटण शुगर वर्क्‍स या कारखान्यास 2017-18 मध्ये ऊस घातलेल्या; परंतु फॉर्म भरून न दिलेल्या 2200 शेतकऱ्यांना प्रतिटन एक हजारप्रमाणे नऊ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. येत्या एक तारखेस हे पैसे जमा होतील. याकामी कुणीही शेतकरी बिलावाचून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
न्यू फलटण शुगर वर्क्‍स लि., या कारखान्याला सन 2017-2018 च्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना एनसीएलटीच्या निर्णयानुसार 25 कोटी 49 लाख रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पेमेंट करण्याची कायदेशीर जबाबदारी नसली तरी आपल्या सूचनेनुसार उर्वरित 2200 शेतकऱ्यांना प्रतिटन एक हजार रुपयांप्रमाणे सुमारे नऊ कोटी रुपयांचे पेमेंट ता. एक नोव्हेंबर दरम्यान करण्याची ग्वाही दत्त इंडिया कंपनीने दिली असल्याचे स्पष्ट करून रामराजे म्हणाले," 2017-18 मध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे 2232 रुपये प्रतिटनाने सुमारे 50 कोटी रुपयांची देणी थकली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा कारखाना नियमानुसार लिलाव प्रक्रियेसाठी ताब्यात घेतला होता. या वेळी एनसीएलटीच्या प्रक्रियेमध्ये आपण शेतकरी प्रतिनिधी म्हणून सहभागी झालो व त्यांची बाजू लावून धरली. 

मुरूम उत्खननात लाखोंची तडजोड; खर्शीत महसूलचा काळाबाजार

शेतकऱ्यांचे देणे कसे महत्त्वपूर्ण आहे, हे न्यायालयात मांडले. शेतकऱ्यांना बिले देण्याचे आदेश मिळविले. या वेळी आपण केलेल्या आवाहनानुसार पाच हजार 800 शेतकऱ्यांपैकी तीन हजार 600 शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत बिल मागणी अर्ज दिले होते. त्यांना 25 कोटी 59 लाख रुपये अदा करण्याचे निर्देश एनसीएलटी न्यायालयाने दिले होते. मात्र, अर्ज न दिलेले दोन हजार 200 शेतकरी बिलापासून वंचित आहेत.'' 

कऱ्हाडला चोवीस तास पाणीयोजना पूर्णत्वास; तांत्रिक कामे, निविदांची प्रक्रियाही पूर्ण

आगामी काळात कारखान्याची गाळप क्षमता वाढ, अर्कशाळा व अन्य उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारताना ऊस उत्पादक शेतकरी हा महत्त्वाचा घटक असल्याने तुमची कायदेशीर जबाबदारी नसली तरी व्यावसायिक जबाबदारी म्हणून उर्वरित शेतकऱ्यांचे पेमेंट करण्याची आवश्‍यकता आपण श्री दत्त इंडिया कंपनीला समजावून दिल्यानेच त्यांनी उर्वरित शेतकऱ्यांना प्रतिटन एक हजार रुपयांप्रमाणे सुमारे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ता. 1 नोव्हेंबर दरम्यान वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित रक्कम आर्थिक तरतूद झाल्यानंतर वर्ग करण्याचेही त्यांनी मान्य केल्याचे रामराजे यांनी सांगितले. या वेळी माजी सभापती शंकरराव माडकर, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, के. के. भोसले, समीर भोसले, सागर कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सतीश माने, माऊली भोसले आदींची उपस्थिती होती. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The New Phaltan Sugar Factory Will Pay The Farmers Satara News