लाॅकडाउन इफेक्ट : एसपी तेजस्वी सातपुते 'ही' गाेष्ट गांभीर्याने घेतील ?

प्रवीण जाधव
बुधवार, 29 जुलै 2020

जिल्ह्यातील सावकारांची ही मुजोरी अधीक्षक पाटील यांच्या काळात मोक्‍काचे गुन्हे दाखल होऊ लागल्यामुळे थंडावली होती. त्यामुळे अनेकांनी वसुलीही थांबविली होती. परंतु, शांत झालेले सावकार पुन्हा हातपाय पसरू लागलेले आहेत. नागरिकांनी बिनधास्त तक्रार करायला जावे, असे विश्‍वासार्ह वातावरण तयार करण्यात पोलिस दल अपशयी ठरत आहे. 

सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांत देशासह जिल्ह्याला लॉकडाउनचा सामना करावा लागलेला आहे. त्यामुळे बॅंकांची देणीही भागवणे सर्वसामान्यांना शक्‍य नाही. अशीच परिस्थिती सावकारी कर्जाच्या बाबतीतही आहे. त्यामुळे त्यांच्या तगाद्यामुळे जिल्ह्यातील आणखी आत्महत्या होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी सावकारांना जरब बसविणारी कारवाई पोलिस दलाकडून अपेक्षित आहे. 

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या काळात जिल्ह्यातील खासगी सावकारांचे भयावह रूप सर्वांसमोर आले. तत्पूर्वी एकापेक्षा एक गंभीर स्वरूपाच्या खासगी सावकारीच्या घटनांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. सावकारांना कायद्याचे कोणतेही भय नसल्याचे पदोपदी जाणवत होते. खासगी सावकारांची जिल्ह्यातील शहरापासून गावांपर्यंत निर्माण झालेली ही साखळी उद्‌ध्वस्त करणे पोलिसांना शक्‍य झाले नव्हते. किमान त्यांच्यावर कायद्याची दहशतही बसवता आली नव्हती. त्यामुळे सर्वसामान्यांचा थरकाप उडविणारे प्रताप खासगी सावकारांकडून होत होते. नडलेल्यांच्या जमिनी, गाड्या लुबाडणे एवढ्यावर न थांबता त्यांच्या कुटुंबाच्या अब्रूवर हात टाकण्याचे प्रकार समोर येत होते.

Video : सातारा जिल्ह्यातील त्या हॉटस्पॉट गावच्या नव्वदीतील आजोबांनी हरविले कोरोनाला

जिल्ह्यातील सावकारांची ही मुजोरी अधीक्षक पाटील यांच्या काळात मोक्‍काचे गुन्हे दाखल होऊ लागल्यामुळे थंडावली होती. त्यामुळे अनेकांनी वसुलीही थांबविली होती. परंतु, शांत झालेले सावकार पुन्हा हातपाय पसरू लागलेले आहेत. नागरिकांनी बिनधास्त तक्रार करायला जावे, असे विश्‍वासार्ह वातावरण तयार करण्यात पोलिस दल अपशयी ठरत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करावा लागत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाने तर, ही परिस्थिती गंभीर बनलेली आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष 15 ऑगस्टनंतर, अशा पद्धतीने करणार मूल्यांकन 

जिल्ह्यातील अनेकांनी विविध अडचणींसाठी सावकारांची कर्जे काढलेली आहेत. परंतु, गेले पाच महिने देशासह जिल्ह्यात लॉकडाउनचा सामना करावा लागत आहे. उद्योग, व्यवसाय बंद आहेत. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या आहेत. हाता-तोंडाची गाठ आणणे नागरिकांना जिकिरीचे बनत चालले आहे. अशाही परिस्थितीत सावकारांचा संपत्तीवाढीचा हव्यास बंद होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांची अत्यंत बिकट अवस्था होत आहे. खाण्याची भ्रांत असताना सावकारी विळख्यातून सुटायचे कसे, असा प्रश्‍न अनेकांना पडलेला आहे. ही परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्‍न नागरिकांसमोर निर्माण होऊ शकतो. सावकारीची ही समस्या गंभीर सामाजिक परिणाम समोर आणू शकते. त्यामुळे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या गोष्टीत गांभीर्याने लक्ष घालून सर्वच सावकारांना धडा बसेल, अशी कारवाई करणे आवश्‍यक बनले आहे. 

कोरोनाबाधित पोलिसास छळणाऱ्या त्या तिघांवर कारवाईचे एसपी तेजस्वी सातपुतेंचे आदेश

सावकारीसह "मोक्का'चेही गुन्हे दाखल 

पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या काळात झालेल्या सावकारांवरील कारवाई करताना काही जणांवर सावकारीप्रश्‍नी गुन्हे दाखल करण्याबरोबर "मोक्का'चेही गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे या काळात सावकारांत पोलिसांबाबत जबरदस्त अशी भीती निर्माण झाली होती. सावकारांनी 
वसुलीसह नवीन पैसे व्याजाने देणे बंद केले होते. त्यानंतर मात्र, आता 
पुन्हा सावकारांनी तोंड वर काढल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Control Of Police Department On Money Lenders In Satara